वार्ताहर/हलशी
तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणून प्रसिद्ध असलेले नंदगड क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या बलिदानाने पुनीत झालेली ही भूमी. या भूमीत आनंदगड किल्ला येथे स्वयंभू दुर्गादेवी मंदिर, दक्षिणेला कदंबकालीन भगवान शिवाचे अति प्राचीन असे श्री तट्टेश्वर मंदिर विख्यात आहे. तसेच ब्रिटिश काळातसुद्धा भाताच्या गिरण्या असल्यामुळे येथे व्यापारासाठी देशपरदेशातून व्यापारी तांदळाचा व्यापार करत असल्यामुळे या गावाला खानापुरातील त्याकाळी आर्थिक वारसा लाभलेले असल्यामुळे पेठ नंदगड या नावाने संबोधले जात होते. तसेच सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा म्हणून सर्वप्रथम माउली मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. या सर्व ऐतिहासिक कारणांमुळे नंदगडला एक विशेष महत्त्व आहे. मात्र नंदगडसारख्या गावात शिवाजी महाराजांचा पुतळा नसल्याची उणीव भासत होती. याची दखल घेऊन आजी-माजी सैनिकांनी नंदगड येथे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. याला नंदगड येथील सर्वांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेपूर्वी पुतळा बसवण्याचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत पंचधातूचा सिंहासनावर बसलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुतळा जुन्या नंदगड येथील राजा शिवछत्रपती चौकात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उपस्थितांनी हा पुतळा बसवण्यासाठी देणग्याही जाहीर केल्या आहेत. आजी-माजी सैनिकांच्या पुढाकारातून शिवपुतळा बसवण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव येथील मूर्तिकार विक्रम पाटील यांना पुतळा करण्याचे काम देण्याचे ठरवण्यात आले असून त्यांना भेटून रक्कम ठरवण्यात आली असून काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक समाजसेवक गुंडू रामा हलशीकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीस्थळ कमिटीचे अध्यक्ष सागर खेमानी पाटील, राजू पाटील, भरमाणी सांगोळकर, श्री लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव आदी उपस्थित होते.









