वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश : निर्णयाकडे रहिवाशांच्या नजरा
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक नगरपालिकांमध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवार दि. 3 रोजी ऑनलाईन बैठक होणार आहे. तब्बल चार महिन्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणाबाबत बैठक होणार असल्याने नागरिकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत. या बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डसह संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
देशातील 61 कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक नगरपालिकांमध्ये हस्तांतरण केले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाला कॅन्टोन्मेंट बोर्डमार्फत प्रशासन चालविणे जिकिरीचे होत असल्याने स्थानिक नगरपालिकांमध्ये हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून मिळकती तसेच खुल्या जागा यांचा सर्व्हे करण्यात आला होता.
बेळगाव वगळता इतर कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये हस्तांतरणासंदर्भात तितकीशी माहिती जमा झालेली नसल्याने टप्प्याटप्प्याने बैठका घेतल्या जाणार आहेत. मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव कॅन्टोन्मेंटची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, पुणे येथील जेसीओ कार्यालय, कर्नाटकचे मुख्य सचिव, बेळगावचे जिल्हाधिकारी तसेच कॅन्टोन्मेंटचे सीईओ व ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो? याकडे कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.









