‘आशीर्वाद’चे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण : चंद्रकांत दोरकाडींची जिद्द-चिकाटी गौरवास्पद : कार्यालय 6000 विवाह सोहळ्यांचे साक्षीदार
बेळगाव
आशीर्वाद मंगल कार्यालय दि. 3 डिसेंबर रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या शुभप्रसंगी त्याच्या गौरवशाली इतिहासाबद्दल व स्थापनेविषयी प्रकाशझोत…
आशीर्वाद मंगल कार्यालयाचा प्रवास खरं तर 1974 मध्ये स्थापनेच्या खूप आधीपासून सुरू झाला. संस्थापक चंद्रकांत रामचंद्र दोरकाडी यांचा जन्म 1935 सालचा. घरी मोठे कुटुंब, घरी नेहमी उत्सव-कौटुंबिक सोहळे, सण या वातावरणामुळे मंगल कार्यालय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. 1935 ते 1962 या काळात कुटुंबाचे सर्व निर्णय कुटुंबप्रमुख म्हणून वडीलच घेत असत. वडिलांच्या हाताखाली काम करताना चंद्रकांत दोरकाडींची उद्योजकता दिसून आली. याच काळात दोरकाडी पुटुंबाने मे. आर. के. दोरकाडी जनरल स्टोअर्स सुरू केले. आजही मार्केट, बेळगाव येथे ही संस्था दिमाखात कार्यरत आहे.
जनरल स्टोअर्सचे व्यवस्थापन नीट सांभाळून चंद्रकांत दोरकाडी नेहमी नवीन उपक्रमांचा विचार करीत असत. याच दरम्यान चंद्रकांत दोरकाडींना दोन-तीन वेळा मिरजेला जाण्याचा योग आला. या भेटीदरम्यान त्यांना मिरजेच्या मंगल कार्यालयात काही उणिवा भासल्या. त्या दूर करून आपणही बेळगाव येथे मंगल कार्यालय सुरू करावे ही कल्पना त्यांच्या मनात घर करून राहिली. या कल्पनेला मूर्त रूप द्यायचे ठरवून दृढ निश्चयाने चंद्रकांत दोरकाडींनी मंगल कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याचे ठरविले. आर्थिक अडचण तर होतीच. त्यांनी जागा मालकाला हप्त्याने पैसे घेण्याची विनंती केली. चंद्रकांत दोरकाडींच्या जिद्द व चिकाटीने प्रभावित झालेल्या जागामालकाने या व्यवहाराला कबुली दिली. 1974 मध्ये सारस्वत बँक व आर्किटेक्ट रमाकांत शानभाग यांच्या सहकार्याने ही वास्तू पूर्ण झाली. अशा प्रकारे आशीर्वाद मंगल कार्यालयाचा जन्म झाला.
सुरुवातीला संपूर्ण ए टू झेड वेडिंग पॅकेज ही संकल्पना बेळगावकरांना फारशी रुचली नाही. पुढे तीन-चार वर्षांनी लोकांना या संकल्पनेतील फायदे दिसू लागले. तेव्हापासून आजपर्यंत आशीर्वाद मंगल कार्यालयाने सुमारे 6000 विवाह सोहळे आयोजित केले आहेत. आज आशीर्वाद मंगल कार्यालय बेळगावमधील प्रथम पसंतीचे वेडिंग डेस्टिनेशन बनले आहे. 1983 मध्ये चंद्रकांत दोरकाडींना मोठा धक्का बसला. पेंडॉलचे काम करत असताना ते अठरा फुटांवरून खाली पडले. परिणामी, उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मुंबईतील डॉक्टर बावडेकर यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रकांत दोरकाडी बरे झाले. पुढे आठ-नऊ महिन्यात पुन्हा चालू लागले. या कठीण काळात त्यांचे पुतणे मोतीचंद दोरकाडी व आनंद बिडीकर या दोघांनी मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या सांभाळले.
1970 साली जन्मलेले चंद्रकांत दोरकाडींचे चिरंजीव योगेश दोरकाडी यांनी 1994 मध्ये आशीर्वाद मंगल कार्यालयाची धुरा हाती घेतली. त्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनेतून व्यवसायाचे आधुनिकीकरण केले. या दरम्यान अनेक सुधारणा करण्यात आल्या. इंजिनियर उमेश सरनोबत व आर्किटेक्ट कलमनी यांनी आधुनिक कल्पना वास्तवात रुपांतरित करण्यास मदत केली. या संपूर्ण प्रवासात चंद्रकांत दोरकाडींना पत्नी लीना दोरकाडी यांची मोलाची साथ लाभली. आज आशीर्वाद मंगल कार्यालयात नवीन पिढीच्या मागणीप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. स्टेज डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन तसेच जेवणाच्या व्यंजनामधील पर्यायांमधून ग्राहक हवा तो पर्याय निवडू शकतात. आता मंगल कार्यालयाचे संपूर्ण व्यवस्थापन योगेश दोरकाडी सांभाळतात. योगेश दोरकाडींच्या व्यवस्थापनाखाली नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. आशीर्वाद मंगल कार्यालयाचा गौरव व कीर्ती पताका येणाऱ्या अनेक वर्षांसाठी अशीच फडकत राहो, हीच सदिच्छा!









