सर्वोदय स्वयंसेवा संघाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : शहराच्या दक्षिण भागातील जुना पी. बी. रोडवरील येडियुराप्पा मार्गावर शहरातंर्गत बससेवा सुरू करा अशी मागणी सर्वोदय स्वयंसेवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. येडियुराप्पा मार्गावर स्वतंत्र बससेवा नसल्याने या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: समर्थनगर, मल्लिकार्जुननगर, ओंमनगर, टीचर्स कॉलनी, कुंतीनगर, गायत्रीनगर, बनशंकरी नगर, नागेंद्र कॉलनी आदी परिसरातील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घेऊन बसस्थानक गाठावे लागत आहे.
स्वतंत्र बस सुरू न केल्यास आंदोलन
येत्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात या मार्गावर वाहतुकीचा अधिक ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे येडियुराप्पा मार्गावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करावी. अन्यथा या मार्गावर आंदोलन छेडू असा इशाराही सर्वोदय स्वयंसेवा संघाने दिला. या मार्गाला लागून नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची ये-जा अधिक असते. मात्र प्रवाशांना ग्रामीण भागात धावणाऱ्या बससेवर अवलंबून रहावे लागत आहे.दरम्यान बसेस प्रवाशांनी भरून धावत असल्याने या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. याची दखल घेऊन या मार्गावर स्वतंत्र शहरातंर्गत बस सुरू करावी, अशी मागणी आहे.









