युनियन जिमखाना चषक आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 16 वर्षाखालील मुलांच्या युनियन जिमखाना चषक आंतर अकादमी चौरंगी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान युनियन जिमखाना व के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट अकॅडमी संघानी आपल्या प्रतिस्पर्धानवर मात करून विजयी सलामी दिली. शुभम खोत, सुमित भोसले याना सामनावीर पुरसकार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण, महांतेश देसाई, प्रशांत लायंदर, दीपक राक्षे व अनिल गवी यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करुन झाले. पहिल्या सामन्यात लायाज क्रिकेट अकादमी संघाने विजया क्रिकेट अकादमी संघाचा 190 धावानी पराभव केला. लायाज क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 बाद 266 धावा केल्या. त्यात कर्णधार शुभम खोतने 72 चेंडूत 15 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 116 व आनंद जाधवने 59 चेंडूत 16 चौकारांसह 100 धावा करीत शतके झळकविली. या दोघांनी पहिल्या गडासाठी 190 धावांची भागीदारी केली.
यश चौगुलेने 16 धावांचे योगदान दिले. विजयातर्फे आऊष काळभैरव, समर्थ पन्हाळकर व अवधूत काळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया क्रिकेट अकादमी संघाचा डाव 19.2 षटकात सर्वगडी बाद 76 धावात आटोपला. त्यात आऊष काळभैरवने 18 व इंदर प्रजापतने 16 धावा केल्या. लायाज अकादमीतर्फे आर्य शेट्टीने 3, सिद्धार्थ व कृष्णकांत गावडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात यजमान युनियन जिमखाना संघाने निना क्रिकेट अॅकॅडमीचा 10 गड्यांनी पराभव केला. निना क्रिकेट अॅकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 24.1 षटकात सर्व बाद 88 धावा केल्या. त्यात सर्वज्ञ पाटीलने 15, प्रज्वल जे.ने 13 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे सुप्रित गेंजी, ओमकार चौगुले व विघ्नेश पाटील यांनी प्रत्येकी 2 तर लक्ष्य शहा, नमन दड्डीकर, मीर मिरजी व फरहान शेख यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 10.2 षटकात 89 धावा करत दहा गड्याने हा सामना जिंकला. त्यात सलामीच्या फलंदाजाने विजयाची उद्दिष्ठ गाठत सुमित भोसलेने 31 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 56 तर आर्यन मुऊडकरने 3 चौकारांसह 29 धावा केल्या.









