2014 मध्ये मंजुरी : 10 वर्षे उलटली तरी अत्याधुनिक सेवा नाही : आरोग्य खात्याने लक्ष देणे गरजेचे
बेळगाव : येथील बिम्सच्या आवारात 188 रुपये कोटी खर्चातून सरकारी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे वृत्त मागील दहा वर्षांपासूनचे आहे. सरकारी रुग्णालयातून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार या विचारातून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा विषय सध्या बाजूलाच राहिल्याने राज्य सरकार असो किंवा आरोग्य खात्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा विसर झाला की काय? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
बेळगावात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे दहा वर्षांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मागील वर्षी इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सध्या सुसज्जित इमारत उभी आहे. मात्र, तेथे तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी नसल्याने आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेंतर्गत तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी एमआयसीयु, आयसीयु यासह 50 खाटांचा तातडीचा चिकित्सा विभाग या इमारतीत सुरू करण्यात आला. पण रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्यासच येथे रुग्ण उपचारासाठी येतील. त्यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आवश्यक घटकांबरोबर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याकडे आरोग्य खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णालयाला वैद्यकीय तज्ञ, उपकरणे, सुविधांसंबंधी सरकारला प्रस्ताव सादर केला तरी सरकारने दखल घेतली नाही. बिम्सच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ‘रुग्णालय लवकर सुरू होईल’ असे मोघमपणे सांगण्यात येत आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात न्युरोसर्जरी, न्युरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, पिडियाट्रिक, नेफ्रोलॉजिस्ट यासारख्या 23 तज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सरकारने अनुमती दिल्यास अधिसूचना जारी करण्यात येईल. नहून हंगामी डॉक्टरांची नेमणूक करून वैद्यकीय सेवेला सुरुवात करण्यात येईल, असे बिम्सच्या सूत्रांनी म्हटले आहे. बिम्सच्या जुन्या इमारतीतील ब्लड बँक, सेंट्रल लॅब, रेडिओलॉजी विभागांचे नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्याप 60 टक्के उपकरणांचे विभाग सुरू करण्याचे शिल्लक आहे, अशी माहिती बिम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सरकारकडून मंजुरी नाही
बेळगाव जिल्ह्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची घोषणा होऊन 10 वर्षे उलटली तरी अत्याधुनिक रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. 2014 मध्ये जिल्ह्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर करण्यात आले. त्यानंतर 2015 मध्ये तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये 535 तांत्रिक व तांत्रिकेतर पदे मंजुरीसाठी सरकारकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. त्याऐवजी 22 तज्ञ डॉक्टर व सुरक्षा, स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमणुकीला मंजुरी दिल्यानंतर त्यांची नेमणूकही झाली आहे.









