वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी रविवारी महान विश्वनाथन आनंदनंतर सोनेरी मानक मानल्या जाणाऱ्या 2800 च्या एलो रेटिंगचा स्तर पार करणारा दुसरा भारतीय आणि जगभरातील 16 वा खेळाडू बनला आहे. नवीन क्रमवारीत त्याला चौथे स्थान प्राप्त झालेले आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक कामगिरीमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावण्याबरोबर सांघिक विजेतेपद पटकावण्यात या 21 वर्षीय खेळाडूने मोलाची भूमिका बजावली होती. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ‘अर्जुन एरिगेसी हा क्लासिकल बुद्धिबळ रेटिंगमधील 2800 एलो रेटिंगचा स्तर पार करणारा इतिहासातील 16 वा खेळाडू ठरला आहे, असे या खेळाच्या जागतिक प्रशासकीय मंडळाने म्हणजे ‘फिडे’ने ‘एक्स’वर नमूद केले आहे. डिसेंबर, 2024 च्या फिडे यादीत त्याचे रेटिंग 2801 आहे.
क्रमवारीत अर्जुन एरिगेसी हा हिकारू नाकामुराच्या (2802) किंचित खाली आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा 2831 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच्यानंतर अमेरिकेचा फॅबियानो काऊआना (2805) आहे. भारतीय बुद्धिबळातील आणखी एक प्रतिभावान खेळाडू 18 वर्षीय डी. गुकेश, जो सध्या सिंगापूर येथे जागतिक विजेतेपदासाठी चीनच्या डिंग लिरेनशी लढत आहे, तो 2783 च्या रेटिंगसह पाचव्या स्थानावर म्हणजे एरिगेसीहून एका स्थानाने खाली आहे. लिरेन 2728 च्या रेटिंगसह 22 व्या स्थानावर आहे.









