ज्योती सिंग कर्णधार, साक्षी राणा उपकर्णधारपदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी रविवारी कनिष्ठ महिला हॉकीपटूंचा 20 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला असून ज्योती सिंगकडे या संघाचे नेतृत्व सोपविले आहे तर साक्षी राणा ही उपकर्णधार असेल. ही स्पर्धा ओमनमधील मस्कत येथे 7 ते 15 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
भारतीय महिला संघ या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून गेल्या वर्षी दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करून पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती. 2025 मध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपसाठी ही स्पर्धा पात्रता स्पर्धा असणार आहे. यजमान ओमानचा संघ अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले असून त्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. भारताचा अ गटात समावेश असून चीन, मलेशिया, थायलंड, बांगलादेश तर ब गटात दक्षिण कोरिया, जपान, चिनी तैपेई, हाँगकाँग चीन, श्रीलंका यांचा समावेश आहे.
निवडण्यात आलेला कनिष्ठ महिला संघ : गोलरक्षक-निधी व अदिती. बचावपटू-मनीषा, ज्योती सिंग (कर्णधार), लालथंतलुआंगी, पूजा साहू, ममता ओरम. मध्यफळी-वैष्णवी विठ्ठल फाळके, सुनेलिता टोपो, इशिका, रजनी करकेटा, साक्षी राणा (उपकर्णधार), खैदेम शिलीमा चानू,. आघाडी फळी-दीपिका, ब्युटी डुंगडुंग, कनिका सिवाच, मुमताज खान, लालरिनपुई. राखीव : बिनिमा धान, हिमांशी शरद गावंडे. प्रशिक्षक- तुषार देशपांडे.









