पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक : सुरक्षा दलांना मोठे यश
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणामध्ये पोलीस चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले आहेत. राज्यातील मुलुगु जिह्यातील एतुरुनगरम जंगलात दहशतवादी आणि पोलिसांमध्ये ही चकमक झाल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. शबरिश यांनी सांगितले. ही चकमक नक्षलवाद्यांनी दोन आदिवासींना गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून ठार केल्याच्या अवघ्या आठवड्यानंतर घडली आहे. सुरक्षा दलांनी अपघातस्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. यामध्ये एके-47 आणि इन्सास रायफल्सचाही समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
एतुरुनगरमच्या जंगल परिसरात शोध मोहिमेदरम्यान तेलंगणा पोलिसांच्या एलिट नक्षलविरोधी दल ‘ग्रेहाऊंड्स’ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोन एके 47 रायफलचा समावेश आहे. मारले गेलेल्या माओवाद्यांमध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) च्या तेलंगणा राज्य समितीचे (येलांडू नरसंपेट) सचिव कुर्सम मंगू उर्फ भद्रू याचाही समावेश असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सीपीआय (माओवादी) संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली असून तिला दहशतवादी संघटना घोषित केली आहे. ही संघटना आदिवासी आणि ग्रामीण भागात आपली पकड कायम ठेवण्यासाठी हिंसक कारवाया करत असते.
पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तेलंगणा पोलिसांच्या विशेष नक्षलविरोधी दल ‘ग्रेहाऊंड्स’ने जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी पोलिसांचा सशस्त्र नक्षलवाद्यांशी सामना झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी सैन्यदलावर गोळीबार सुरू केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही कारवाई केली. यादरम्यान झालेल्या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाले.
नक्षलवादी गट राज्यात हिंसक कारवाया करण्याच्या योजना आखत होते. गुप्त माहितीच्या आधारे त्यांचे लोकेशन पोलिसांना उघड झाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेथे आणखी कोणी नक्षलवादी लपले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या जंगलात शोधमोहीम सुरू ठेवली आहे.









