हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ अगरतळा
बंगाल आणि त्रिपुराच्या रुग्णालयांनी बांगलादेशी रुग्णांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. कोलकात्यायच मानिकतल्लामध्ये असलेल्या जेएन राय रुग्णालयाने बांगलादेशी नागरिकांवरील उपचार अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि इस्कॉनशी संबंधित चिन्म कृष्ण दास यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्ध रुग्णालयाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आम्ही आता कुठल्याही बांगलादेशी नागरिकाला भरती करून घेणार नाही. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि आमच्या दाबद्दल दाखविण्यात येणाऱ्या अनादराबद्दलचे हे प्रत्युत्तर असल्याचे रुग्णालयाचे अधिकारी शुभ्रांशु भक्त यांनी म्हटले आहे. तर बंगालचे शहरविकास मंत्री आणि कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी रुग्णालयाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
आजारी लोकांवर उपचार न करणे योग्य नाही. डॉक्टरांचा धर्म हा रुग्णांवर उपचार करणे असल्याचे हकीम यांनी म्हटले आहे. अगरतळा येथील मल्टी स्पेशलिटी हेल्थकेअरने देखील बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नसल्याची घोषणा केली आहे. हे रुग्णालय भौगोलिक अंतर आणि स्वस्त उपचारामुळे बांगलादेशच्या रुग्णांसाठी पसंतीचे ठिकाण राहिले आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि भारतीय ध्वजाच्या अपमानामुळे आम्ही तेथील रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या आरोग्य केंद्रात बांगलादेशातून येणाऱ्या रोगांवरील उपचार स्थगित करण्याच्या मागणीचे समर्थन करतो. अखौरा चेक पोस्ट आणि रुग्णालयातील आमचा हेल्प डेसक आम्ही बंद केला असल्याचे रुग्णालयाचे मुख्य संचालन अधिकारी गौतम हजारिका यांनी सांगितले आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याकडून नोबेल पदक परत काढून घेण्यात यावे अशी मागणी बंगालच्या तमलुकचे भाजप खासदार अभिजीत गंगोपाध्याय यांनी केली आहे. युनूस यांना शांततेच्या नोबेलने गौरविण्यात आले होते. बांगलादेशातील अशांतता दूर करण्यासाठी युनूस सरकार कुठलीच पावले उचलत नसल्याची स्थिती आहे. याचमुळे नोबेल कमिटीने युनूस यांना दिलेला पुरस्कार काढून घ्यावा असे गंगोपाध्याय यांनी म्हटले आहे.









