कॅनडातील मंदिराबाहेर धक्कादायक प्रकार
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडाच्या ग्रेटर टोरंटो क्षेत्रात एका हिंदू मंदिराबाहेर भारतीय वाणिज्य दूतावासांच्या शिबिरादरम्यान पुन्हा एकदा खलिस्तान समर्थकांनी आगळीक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिराबाहेर खलिस्तान समर्थकांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला होता. भारतीय राजनयिकांना वृद्ध भारतीय नागरिकांना त्यांच्या पेन्शनसाठी मदत करण्याकरता स्कारबोरोमध्ये लक्ष्मीनारायण मंदिरात एका कॉन्सुलर शिबिराचे आयोजन केले होते. यादरम्यान खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली आहेत. या खलिस्तान समर्थकांनी भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
खलिस्तान समर्थकांच्या या कृत्यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत असल्याचा दावा एका स्थानिक पत्रकाराने केला आहे. संबंधित खलिस्तान समर्थक हे शिख फॉर जस्टिस या संघटनेशी संबंधित होते. खलिस्तान समर्थकांनी यावेळी कॅनडा सरकारला भारतीय वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आवाहन केले आहे.
हा शिख विरुद्ध कुठल्याही धार्मिक समुहाचा मुद्दा नाही. आम्ही भारत सरकार विरोधात उभे ठाकलो आहोत असा दावा शिख फॉर जस्टिसचे प्रवक्ते कुलजीत सिंह यांनी केला आहे. तर शिख फॉर जस्टिसला भारत सरकारने दहशतवादी संघटना घोषित करत त्यावर बंदी घातली आहे.
कॅनडातील एका न्यायालयाने अलिकडेच टोरंटोमध्ये मंदिराच्या परिसरात विना अनुमती करण्यास बंदी घातली होती. तरीही खलिस्तान समर्थकांनी मंदिराबाहेर निदर्शने केली आहेत. भारतीय राजनयिकांनी संबंधित कॉन्सुलर शिबिराचे आयोजन हे हिंदू, शिख, मुस्लीम आणि ख्रिश्चनांसमवेत विविध धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वृद्ध पेन्शनधारकांच्या मदतीसाठी केले होते.









