वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोने तारण ठेवून कर्ज घेण्याच्या प्रमाणात देशात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये 1 लाख 54 हजार 282 कोटी रुपयांच्या कर्जांची उचल सोने तारण ठेवून करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 50.4 टक्के अधिक आहे. इतर तारणे ठेवून किंवा इतर मार्गांनी मिळविलेल्या कर्जांची वाढ केवळ सरासरी 9 टक्के झाली आहे. लोक आपल्याकडे पडून असलेल्या सोन्याचा उपयोग कर्जे घेण्यासाठी करीत आहेत, असे या वरुन दिसून येते. सोने तारण कर्जात वाढ होण्याची अनेक कारणे आहेत, असे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
व्यक्तीगत कर्जाच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.6 टक्के वाढ झाली आहे. तर गृहकर्ज उचलीच्या प्रमाणात 12.1 टक्के वाढ झाली आहे. सध्याच्या वित्त वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये उचल करण्यात आलेल्या गृहकर्जाचे प्रमाण 28.7 लाख कोटी रुपये इतके असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. व्रेडिट कार्डांवरच्या कर्जाचे प्रमाण 9.2 टक्क्यांनी वाढले आहे. पहिल्या सात महिन्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपयांची क्रेडिट कार्ड कर्जे घेण्यात आली आहेत.
धोरण बदलल्याने वाढ
सोनेतारण कर्जात वाढ होण्याचे कारण बँकांनी या कर्जाची प्रक्रिया सुलभ केली आहे, हे आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी या धोरणाचे सुसूत्रीकरण करण्याची सूचना बँकांना केली होती. तसेच नियम सुलभ केले जावेत ही सूचनाही केली होती. त्यानुसार बँकांनी कृती केल्याने सोनेतारण कर्जाच्या प्रमाणात वाढ झाली. अशी आकडेवारी रिझर्व्ह बँकेकडून शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकंदर कर्जउचल किती…
सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये विविध प्रकारे घेतलेल्या एकंदर कर्जाची रक्कम 172.4 लाख कोटी इतकी आहे. हे प्रमाण मागच्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 4.9 टक्के अधिक आहे. तर उद्योगधंद्यांना जे कर्ज देण्यात आले त्याचे प्रमाण 3.3 टक्के वाढले आहे, अशी माहिती दिली गेली.









