भारतानं ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवलं तेव्हा काय परिस्थिती होती ?…मायदेशात न्यूझीलंडकडून धुलाई झालेली. रोहित शर्माबरोबर शुभमन गिललाही मुकण्याचा प्रसंग आलेला…मोहम्मद शमीविना दोन नवोदित गोलंदाजांना घेऊन यावं लागलेलं, तर काही युवा फलंदाज प्रथमच ऑस्ट्रेलियन भूमीत उतरणारे…या पार्श्वभूमीवर आपल्या वेगवान माऱ्याच्या जोरावर भारताचा सुपडा साफ करण्याचे आडाखे कागारुंनी आखले होते. पण पहिल्याच दिवसापासून ते उलटले. याचं कारण जसप्रीत बुमराह नावाचं ‘बुमरँग’…
पर्थमधील ‘बॉर्डर-गावस्कर’ चषक मालिकेतील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस…भारताला पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत गुंडाळल्यानं यजमान ऑस्ट्रेलिया भलतीच आनंदात होती…सामना खिशात पडलाच अशी त्यांची धारणा बनली…पण त्यांना सुरुवातीपासूनच ज्याची धास्ती होती नेमका तोच गोलंदाज आग ओकू लागला…पहिला चेंडू उस्मान ख्वाजाच्या पॅडवर, दुसरा नॅथन मॅकस्विनीच्या कोपरावर. त्याच शैलीत, त्याच पद्धतीनं सोडलेला तिसरा चेंडू थोडासा बाहेर जाणारा…तर 13 वा चेंडू आत घुसणारा. यष्ट्या वाचविण्याच्या भरात मॅकस्विनीनं तो पॅडवर घेतला. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला तो सलामीवीर पायचित असल्याचा…
त्यानंतर मार्नस लाबुशेनच्या बाबतीत जे घडलं ते तर अधिकच वेदनादायी. पहिला चेंडू इनडीपर, तर दुसरा अचूक टप्प्यावर पडून बॅटची कड घेऊन गेलेला. मात्र तो झेल सोडल्यानं जीवदान मिळालं…‘त्या’ गोलंदाजानं ऑस्ट्रेलियावर टाकलेल्या दबावाचं धुकं दाट होत गेलं अन् कांगारू त्यात हरवत गेले…मग ख्वाजानं दुसऱ्या स्लिपमध्ये झेल दिला, तर गोंधळलेल्या स्टीव्ह स्मिथला पहिल्याच चेंडूवर परिपूर्ण ‘इन-डीपर’नं परतीची वाट दाखविली…ऑस्ट्रेलियासाठी बूमराह हे नाव ‘बूमरँग’ बनलं…भारतीय कर्णधाराचा पहिल्या स्पेलचे आकडे चित्र दाखवत होतं ते 6 षटकांत 3 निर्धाव अन् 9 धावा देऊन 3 बळी असं उरात धडकी भरविणारं. त्यानं इतर तरुण गोलंदाजांना चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करावी याचा जणू पाठच घालून दिला !…
पहिल्या कसोटीत अपेक्षेप्रमाणं सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या जसप्रीत बुमराहनं मग म्हटलं की, त्याला बालपणापासून सवय आहे ती कठीण प्रश्नांची उत्तरं शोधण्याची…या पार्श्वभूमीवर पहिला डाव कोसळून देखील न खचलेल्या भारतीय कर्णधाराचे हात कांगारुंना धडा शिकविण्यासाठी शिवशिवत होते…त्यानं आपल्या फारशा अनुभव नसलेल्या गोलंदाजांना सूचना केली ती यष्ट्यांवर अचूक मारा करण्याची. ‘भारताचा एखादा वेगवान गोलंदाज पर्थवर जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तेथील झपकन उसळणाऱ्या चेंडूचं दर्शन घडल्यानंतर त्याच्या उत्साहाला कमालीचं भरतं येतं अन् त्याभरात लाभ मिळतो तो मात्र फलंदाजाला’, बुमराहचे शब्द…याउलट सामन्यात 134.3 षटकं टाकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांना केवळ 6.4 टक्के चेंडूंचाच रोख यष्ट्यांवर ठेवणं शक्य झालं…
जसप्रीत बुमराहचं फार मोठं कौशल्य म्हणजे वातावरण व परिस्थिती ओळखण्याचीं क्षमता. त्याला वाटतंय की, नितीशकुमार रे•ाr नि हर्षित राणा हे नवोदित असून सुद्धा अजिबात गांगरून न जाता एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणं खेळले…पण भारतीय कर्णधारानं सर्वांत जास्त स्तुती केलीय ती सलामीवीर यशस्वी जैस्वालची. ‘मी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचीच निवड केली असती. जैस्वालचा हा कसोटीतील सर्वोत्कृष्ट डाव. आक्रमक पद्धतीनं खेळण्याची सवय असूनही त्यानं त्याला मुरड घालून चिकाटीनं खेळपट्टीला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात संयम देखील ठासून भरलाय हे दाखवून दिलं’, बुमराहनं दिलेली शाबासकी…
जसप्रीत बुमराहच्या जबरदस्त कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्याला भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरविणं बरोबर ठरेल काय ?…काहींनी महान कपिल देव यांचा विचार न करता त्याला ती उपाधी देण्यास प्रारंभ केलाय…त्यामागचं सर्वांत मोठं कारण लपलंय ते कुठल्याही खेळपट्टीवर एखाद्या कसलेल्या फलंदाजाला देखील बाद करण्याच्या त्याच्या कौशल्यात. परंतु बुमराहला सिंहासनावर बसविण्याच्या गडबडीत कपिल देव यांच्या अनेक ‘स्पेल्स’चा त्यांना विसर पडलाय. उदाहरणार्थ अहमदाबाद इथं एका डावात 83 धावा देऊन 9 बळी मिळविताना त्यांनी गॉर्डन ग्रिनीज, डेस्मंड हेन्स, व्हिव रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईड यासारख्या एकाहून एक दिग्गजांना दाखविलेली तंबूची वाट…
कपिल यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी 434 बळी मिळविलेत ते अन्य वेगवान गोलंदाजांच्या आधाराविना. याउलट बुमराहला साथ मिळालीय ती तितक्याच तोलामोलाच्या साथीदारांची. त्यानं जेव्हा भारतीय संघात प्रवेश मिळविला तेव्हा सोबतीला होते 250 हून अधिक बळी मिळविलेले ईशांत शर्मा, मोहम्मद शमीसारखे वेगवान गोलंदाज. तर कपिल देव यांच्या कुठल्याही सहकाऱ्यानं 100 हून जास्त बळींची नोंद केलेली नव्हती…शिवाय सध्या ‘डीआरएस’चा जमाना असल्यानं त्याची सुद्धा खूप मदत लाभतेय. हे भाग्य कपिल यांच्या वाट्याला आलं नव्हतं…खरं सांगायचं झाल्यास कपिल देव अन् बुमराह यांची तुलनाच करणं अशक्य. कारण हरयाणाचा तो महान गोलंदाज क्रिकेटच्या पुस्तकातील धड्यांप्रमाणं गोलंदाजी टाकायचा, तर गुजरातच्या विचित्र शैलीच्या गोलंदाजानं त्या पुस्तकाला कोपऱ्यातच टाकलंय…
अन्य एक फार मोठा फरक म्हणजे बहुतेक सर्व गोलंदाज गोलंदाजीच्या रेषेच्या 10 सेंटीमीटर पुढं येऊन चेंडू टाकतात, तर बुमराह मात्र चक्क 34 सेंटीमीटर. हा 24 सेंटीमीटरचा फरकच त्याला फार भेदक बनवितोय…कपिल यांच्या समर्थकांच्या मते, 80 च्या दशकात जर बुमराह खेळला असता, तर त्याच्या शैलीमुळं फारसं क्रिकेट वाट्याला आलं नसतं. कारण त्या पद्धतीनं गोलंदाजी करण्यास त्याला एखाद्या प्रशिक्षकानं मान्यताच दिली नसती. पण क्रिकेट प्रचंड प्रमाणात बदललंय नि प्रगत ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा लाभ देखील त्याला मिळतोय हे नाकारता येणार नाहीये…
खेरीज कपिल देव फक्त दिग्गज गोलंदाजच नव्हते, तर त्यांनी कसोटी सामन्यात नोंदविलेल्या 5 हजारांहून अधिक धावा त्यांना सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत नेऊन बसवितात. त्यांच्या उदयामुळं भारतातील कित्येक गोलंदाजांना वेगवान गोलंदाजीच्या दिशेनं वळण्याची प्रेरणा मिळाली…एक मात्र खरं की जसप्रीत बुमराह कपिलप्रमाणं नैसर्गिक अॅथलीट नसला, तरी त्यानं अनेक कारकीर्द संपवू शकणाऱ्या दुखापतींना तोंड देत पुनरागमन केलंय…असो…40 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी भारताला स्वप्नं पाहण्याची सवय लावली, तर भेदक जसप्रीत बुमराह सध्या ती स्वप्नं पूर्ण करतोय !
बूम, बूम, बूमराह…
- यंदा 10 कसोटी सामन्यांत जसप्रीत बुमराहनं एकूण 49 फलंदाजांना पॅव्हिलियनची वाट दाखविलेली (सरासरी 15.24) असून डावात 5 बळी मिळविण्याची कामगिरी तीन वेळा नोंदविलीय…
- 2018 साली आपल्या पहिल्याच मोसमात बुमराहनं 9 कसोटी सामन्यांत 48 बळी मिळविले होते…
- बुमराहच्या पर्थमधील 72 धावांत 8 बळींनी विदेशातील भारतीय गोलंदाजांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या यादीत पटकावलाय तो तिसरा क्रमांक. त्यात पहिल्या स्थानावर अव्वल लेगस्पीनर चंद्रशेखरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच 1977-78 च्या मालिकेत मिळविलेले 104 धावांत 12 बळी…त्यानंतरचं स्थान इरफान पठाणला. त्यानं बांगलादेशविरुद्ध 2004-05 च्या मोसमात 96 धावा देऊन 11 बळी टिपले होते…
- जसप्रीत बुमराहनं 181 कसोटी बळींपैकी तब्बल 93 फलंदाजांचा एक तर त्रिफळा उडविलाय किंवा त्यांना पायचित तरी केलंय…
- त्यानं आजवर ऑस्ट्रेलियात 40 फलंदाजांना टिपलेलं असून त्यापैकी 22 जणांना बाद केलंय ते यष्ट्या उद्धवस्त करून किंवा ‘एलबीडब्ल्यू’च्या जाळ्यात पकडून…
- मायदेशात बुमराहनं 17.19 च्या सरासरीनं मिळविलेत ते 47 बळी, तर विदेशी भूमीत 20.38 च्या सरासरीनं 134 बळी…परदेशात त्यानं नऊ वेळा पाच बळी टिपलेले असून त्यापैकी सात वेळा कामगिरी ‘सेना’ देशांविरुद्धची (दक्षिण अफ्रिका इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया). कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतकी मजल मारता आलेली नाहीये…
– राजू प्रभू









