भारताकडून शक्तिप्रदर्शन : आयएनएस अरिघातमधून डागले क्षेपणास्त्र : चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय नौदलाने एक मोठे यश प्राप्त करत के-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. के-4 क्षेपणास्त्राचे हे परीक्षण नौदलाच्या ताफ्यात अलिकडेच सामील पाणबुडी आयएनएस अरिघातद्वारे करण्यात आले आहे. आण्विक पाणबुडी आयएनएस अरिघातचे संचालन स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडून केले जाते. अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम के-4 एसएलबीएम क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 3500 किलोमीटर इतका आहे.
हे क्षेपणास्त्र भारताला सेकंड स्ट्राइकची क्षमता मिळवून देते. याचा अर्थ जमिनीसोबत पाण्यातून देखील पाणबुडीच्या मदतीने हल्ला करू शकते. भारताच्या न्युक्लियर ट्रायडला (जमीन, आकाश आणि पाण्यातून अण्वस्त्र हल्ल्याची क्षमता) हे क्षेपणास्त्र मजबूत करते. आयएनएस अरिघातला एकाचवेळी 12 के-15, चार के-4 आणि 30 टॉरपीडोने सज्ज केले जाऊ शकते. कुठल्याही पाणबुडीतून के-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे हे पहिले यशस्वी परीक्षण आहे. परीक्षणावरून अधिकारी सैन्य अणि राजकीय नेतृत्वाला विस्तृत माहिती देणार आहेत.
के-4 एसएलबीम क्षेपणास्त्राचे वजन 17 टन आहे. याची लांबी 39 फूट, व्यास 4.3 मीटर आहे. हे अत्यंत सहजपणे 2500 किलोग्रॅमपर्यंतच्या अण्वस्त्राला वाहून नेऊ शकते. यात सॉलिड रॉकेट मोटर आणि सॉलिड प्रोपेलेंट लावण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राला अरिहंत-श्रेणी सबमरीनमध्ये (आयएनएस अरिघात आणि आयएनएस अरिहंत) तैनात करण्यात आले आहे. या पाणबुडीत चार वर्टिकल लाँचिंग सिस्टीम असून त्यातून के-4 प्रक्षेपित केले जाऊ शकते.
भारताचे प्रथम न वापराचे धोरण
भारताच्या आण्विक धोरणात प्रथम हल्ला न करण्याचे तत्व सामील आहे. परंतु हल्ल्याच्या स्थितीत प्रत्युत्तरादाखल अण्वस्त्र वापरण्यास मागेपुढे पाहणार नसल्याची भूमिका भारताने घेतली आहे. के-4 सारखी क्षेपणास्त्रs या धोरणाला मजबूत आधार प्रदान करतात. पाणबुडी आधारित अण्वस्त्र असणे शत्रूसाठी आव्हानात्मक आहे, कारण त्याला ट्रॅक करणे अत्यंत अवघड असते.
चीनचा पूर्ण भूभाग मारक पल्ल्यात
हे परीक्षण भारताच्या आण्विक क्षमतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि भारत समुद्रातूनही दीर्घ पल्ल्याचे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम ठरला आहे. नौदलाकडून के-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणामुळे आता चीनचा बहुतांश भूभाग भारताच्या अण्वस्त्रांच्या कक्षेत आला आहे. नौदलाने बंगालच्या उपसागरात या क्षेपणास्त्राचे परीक्षण केल आहे.
परीक्षणाचा इतिहास
विशाखापट्टणमनजीक 2010 मध्ये समुद्रात 160 फूट खाली पॉन्टूनद्वारे पहिले यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. यानंतर 2014 मध्ये दुसरे परीक्षण देखील पॉन्टूनद्वारे करण्यात आले होते. याच्या 2 वर्षांनी 2016 मध्ये आयएनएस अरिहंतमधून 700 किमी मारक पल्ल्याचे यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. परंतु 2017 मध्ये पॉन्टून लाँच अयशस्वी ठरले होते. तर 3 वर्षांनी 2020 मध्ये पॉन्टूनद्वारे 3500 किमीच्या मारक पल्ल्याचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. यानंतर आता 2024 मध्ये आयएनएस अरिघातद्वारे पहिले यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.
के-4 एसएलबीएम अन् के-15 ची तुलना
- वैशिष्ट्यो के-15 क्षेपणास्त्र के-4 क्षेपणास्त्र
- मारक पल्ला 750 किलोमीटर 3500-4000 किमी
- अचूकता मर्यादित अत्याधिक अचुकता
- मॅन्यूवरेबिलिटी कमी उत्तम
- शक्ती अन् प्रभाव मर्यादित रणनीतिक आघाडी









