वार्ताहर/धामणे
शेतकऱ्यांना निसर्गाची साथ असेल तर शेतीतील कोणतेही पीक शेतकऱ्याला फायदेशीर ठरते. परंतु निसर्गाने ऐनवेळी साथ दिली नाहीतर कोणत्याही पिकांचे मोठे नुकसान होते. अशीच अवस्था आज धामणे, बस्तवाड, हलगा, नागेनहट्टी, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.) या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. यंदा भात पिकाच्या पेरणीपासून पावसाने उत्तम साथ दिली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी भातपिकाबरोबर बटाटा, भुईमुग, रताळी, सोयाबीन ही सर्वच पिके उत्तम आली होती. परंतु दसरा उत्सवाच्या अगोदर सोयाबीन पिकाची कापणी सुरू असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पावसामुळे बाद होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
दसऱ्यानंतर भातपीक कापणीला सुरुवात करण्यात येत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने सतत 10 ते 12 दिवस हजेरी लावल्याने धामणे, बस्तवाड, हलगा, नागेनहट्टी, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.) या भागातील हातातोंडाला आलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे नुकसान झाले. आता कडधान्य पिकाची शाश्वती नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण या भागात हिवाळी पीक म्हणून मसूर, वाटाणा, गहू, हरभरा, मोहरी या सर्व पिकांची पेरणी भातपिकाची कापणी झाल्यानंतर करण्यात येते. परंतु यावर्षी परतीचा पाऊस उशिरा जास्त प्रमाणात होवून शिवारात पाणी साचल्याने कडधान्य पेरणीला एक ते दीड महिना उशीर होत आहे.









