प्रदर्शन पाहण्याची आज शेवटची संधी : पाच दिवसात नागरिकांचा भरभरून प्रतिसाद : ‘हास्यसंजे’ कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद
बेळगाव : ‘घराला घरपण देण्यासाठी’ तरुण भारत पुरस्कृत घरकुल प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण क्षेत्राविषयी माहिती देणारे स्टॉल मांडण्यात आले आहेत. घरासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळत असल्याने मागील पाच दिवसात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मंगळवार दि. 26 रोजी या प्रदर्शनाची सांगता होत आहे. त्यामुळे प्रदर्शन पाहण्याची आज नागरिकांना शेवटची संधी असणार आहे. तरुण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरर्स असोसिएशनतर्फे घरकुल 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आपले स्वत:चे घर व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करताना नवीन तंत्रज्ञान, नवीन साहित्य याची माहिती घेणे आवश्यक असते. हीच माहिती देण्याचा प्रयत्न घरकुल प्रदर्शनाने केला आहे. सोमवारीदेखील प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली होती. गृहनिर्माण स्टॉलवर माहिती घेणाऱ्यांची संख्या मोठी होती.
इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य, इंटेरियर डिझाईन, हार्डवेअर, इन्शुरन्स, सीसीटीव्ही, सोलार, सजावटीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रदर्शन पाहणाऱ्यांची गर्दी यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचबरोबर गृहपयोगी साहित्य, सौंदर्य प्रसादने यांचेही स्टॉल मांडण्यात आले आहेत. महिलावर्गाचा ओढा या स्टॉलकडे अधिक होता. त्याचबरोबर स्वादिष्ट फास्टफुड, मिल्कशेक, आइस्क्रीम यासह इतर खाद्यपदार्थांची रेलचेल होती. सोमवारी कानडी हास्य कलाकार महादेव सत्तीगेरी यांच्या ‘हास्यसंजे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी लहान लहान विनोद सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. महांतेश कुणाल या बालकलाकाराने विविध पक्षी, प्राणी, वाहने यांचे हुबेहुब आवाज काढून प्रेक्षकांची दाद मिळविली. ऋत्विक सत्तीगेरी यांनीही या कार्यक्रमाला रंगत आणली.
कराओके गाण्यांचा आज कार्यक्रम 
घरकुल प्रदर्शनात मंगळवार दि. 26 रोजी कराओके गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वा. निविदार्पणा अकॅडमी ऑफ म्युझिकतर्फे हिंदी, मराठी व कानडी गीते सादर केली जाणार आहेत. घरकुल प्रदर्शनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होईल. त्यामुळे रसिकांना जुन्या-नव्या सदाबहार गाण्यांचा आस्वाद घेता येईल.









