अबकारी खात्याची कारवाई
वास्को : झुआरीनगरातील सांकवाळ औद्योगिक वसाहतीच्या आवारात 1 कोटी 34 लाख व 80 हजार रूपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला आहे. हा मद्यसाठा व्हिस्कीचा असून हा साठा दोन ट्रकांमध्ये होता. हा मद्यसाठा कुणाचा हे स्पष्ट झालेले नाही. वास्कोतील अबकारी खात्याच्या पथकाने हा साठा व दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहेत. वास्कोतील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी खात्याचे पथक गस्तीवर असताना हा साठा आढळून आला. औद्योगिक वसाहतीच्या आवारात गोव्याबाहेरील दोन ट्रक संशयापदरित्या उभे करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्या परिसरात दारूचा वास पसरला होता. त्यामुळे त्या ट्रकांमध्ये मद्याचा साठा असल्याचा संशय बळावला होता.
परंतु हा माल कुणाचा हे उघडकीस येत नव्हते. त्यामुळे अबकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती. परंतु तरीही ते ट्रक व त्या मालावर दावा सांगणारा कुणीच त्या ठिकाणी फिरकला नाही. अबकारी आयुक्त, सहआयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार या पथकाने दोन्ही ट्रकांची तपासणी केली. त्या ट्रकांमध्ये 1 कोटी 34 लाख व 80 हजार रूपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला. या साठ्यामध्ये दोन प्रकारच्या व्हिस्कीचे खोके आहेत. हा सर्व साठा अबकारी पथकाने जप्त केला आहे. तसेच ते दोन्ही ट्रकसुध्दा ताब्यात घेतलेले आहेत. अबकारी निरीक्षक रमीझ मुल्ला, नदीम बेग तसेच त्यांचे कर्मचारी शब्बीर शेख, उदय नाईक, कुणाल रायकर, रश्वेश गावडे व इतरांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तपास अबकारी आयुक्त व सहआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वास्कोतील अबकारी अधिकारी करीत आहेत.









