बेळगावच्या सीपीएड मैदानावर आयोजन : रियल इस्टेट-बांधकाम क्षेत्राची संपूर्ण माहिती एका छताखाली : 170 हून अधिक स्टॉल
बेळगाव : प्रत्येकाच्या मनामनातील ‘घरकुल’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल 2024’ प्रदर्शन 21 ते 26 नोव्हेंबरदरम्यान बेळगावच्या सीपीएड मैदानावर होणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व माहिती तसेच तंत्रज्ञान एकाच छताखाली पाहता येणार आहे. केवळ इतकेच नाही तर आपल्या घराचे बुकींगदेखील या प्रदर्शनात करता येणार आहे. सीपीएड मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. सीपीएड मैदानावर सायंकाळी 5 वाजता महानगरपालिका आयुक्त बी. शुभा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल शरद पै, तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, सतीश शुगर्स लि.चे चेअरमन प्रदीपकुमार इंडी व अल्ट्राटेक सिमेंटचे उत्तर कर्नाटक व गोवा विभागाचे विभागीय विक्री प्रमुख विजयकुमार बी. उपस्थित राहणार आहेत.
दि. 21 ते 26 नोव्हेंबरदरम्यान प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. दि. 22 रोजी दुपारी 4 ते 10, दि. 23 व 24 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 व दि. 25 व 26 रोजी दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव व कन्सल्टींग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन भरविले जात आहे. यावर्षी प्रदर्शनाला प्रिया शक्ती स्टील हे डायमंड प्रायोजक तर अल्ट्राटेक सिमेंट, गोल्ड प्रायोजक लाभले आहेत. तसेच बँक ऑफ बडोदा व बेंचमार्क फायनान्शियल सर्व्हिसेस हे सिल्व्हर प्रायोजक असून सिद्धार्थ पाईप कॉर्पोरेशन हे व्हेन्यू प्रायोजक आहेत. यावर्षी प्रदर्शनात 170 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत. गृहनिर्माणबरोबरच गृहोपयोगी वस्तु तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदाचे 11 वे घरकुल प्रदर्शन सीपीएड मैदानाच्या प्रशस्त जागेवर भरविण्यात येत आहे.
प्रदर्शनाची उत्सुकता
स्वत:चे घरकुल असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे आपल्या घरकुलात उत्तम सुविधा असाव्यात यासाठी सध्याच्या तंत्रज्ञानाची माहिती आवश्यक असते. ही संपूर्ण माहिती घरकुल प्रदर्शनातून मिळणार आहे. नवीन प्रकारचे बांधकाम साहित्य, सिमेंट, वाळूचे पर्याय, खडी, विटा, लोखंड, दरवाजे, वॉटरप्रुफींग, गार्डनचे साहित्य, घराची सिक्युरिटी, नवीन पद्धतीचे नळ, सोलार, हिटर, फरशी यासह इतर साहित्य एका छताखाली पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रदर्शनाबाबत उत्सुकता आहे.
‘घरकुल’ प्रदर्शनात शुक्रवारी संगीत कार्यक्रम : कलर्स टीव्हीच्या कलाकारांचा राहणार सहभाग
‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल 2024’ प्रदर्शन 21 ते 26 नोव्हेंबरपर्यंत सीपीएड मैदानावर होणार असून यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे. शुक्रवार दि. 22 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत संगीत सुधा कार्यक्रम होणार असून यामध्ये कन्नड कलर्स टीव्हीचे गायक सागर चंदगडकर, मराठी कलर्स टीव्हीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील गायिका अंतरा कुलकर्णी तसेच हास्य कलाकार संदीपजी (हुबळी) व अरुण शिरगापूर यांचा सहभाग राहणार आहे.









