प्रवाशांचे होताहेत हाल : ऐन निवडणूक काळात मतदारांची निराशा
बेळगाव : बेळगाव-कोकण मार्गावरील बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. ऐन महाराष्ट्रातील निवडणूक काळातच बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. दोन्ही राज्यांच्या महामंडळाच्या बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बेळगाव बसस्थानकातून कोकणात धावणाऱ्या मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, राजापूर आदी बसफेऱ्या अनियमित झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बेळगाव-कोकण प्रवास करणे त्रासदायक ठरू लागले आहे. त्याचबरोबर कोकणातूनही बेळगावकडे धावणाऱ्या बससेवा कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. महिलांना महाराष्ट्रात हाफ तिकीट तर कर्नाटकात मोफत प्रवास दिला जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. दरम्यान विविध मार्गांवर बससेवेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बससेवा अनियमित होऊ लागल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागला आहे.
मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांची गैरसोय…
बेळगाव-कोकण बससेवा विस्कळीत झाल्याने मतदानासाठी कोकणात जाणाऱ्या मतदारांची गैरसोय होत आहे. बुधवार दि. 20 रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. मात्र बेळगाव-कोकण मार्गावर बससेवा सुरळीत नसल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. सध्या बेळगावात असणारे मात्र मतदान कोकणात असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. मतदानासाठी जाताना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागणार आहे.









