कारवार : मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलत फसवणूक केल्याप्रकरणी आंतर जिल्हा आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. कारवार, अंकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरुणकुमार मलेशप्पा (रा. बुकापट्टण, ता. शिरा, जिल्हा तुमकूर) असे आहे. आरोपीकडून 25 रुपये रोख रक्कम, एक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकलबेन येथील सुरेखा सुधीर नावाची महिला 22 ऑक्टोबर रोजी अंकोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे दाखल झालेल्या अज्ञाताने सुरेखा यांना मदत करण्याच्या बहाण्याने सुरेखा यांचे पीन क्रमांक जाणून घेतला आणि हातचलाखी करुन एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर आरोपीने कुमठा गाठले आणि सुरेखा यांच्या कार्डचा वापर करुन 40 हजार रुपये काढले. या घटनेनंतर अज्ञातांविरोधात अंकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
अशाच प्रकारे आणखी एक प्रकरण
अशाच प्रकारच्या अन्य एका प्रकरणाबाबत अंकोला तालुक्यातील बेळसे येथील उमेश वासू गौडा यांच्याबाबत घडली होती. गेल्या 9 नोव्हेंबर रोजी पैसे काढण्यासाठी उमेश एटीएमवर गेले होते. त्यावेळी तेथे दाखल झालेल्या अज्ञाताने गौडा यांना मदत करण्याचे नाटक करुन गौडा यांच्याकडून पीन जाणून घेतले आणि एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा कुमठा गाठले आणि गौडा यांचे कार्ड वापरुन 37 हजार रुपये एटीएममधून काढले. दोन्ही प्रकरणामध्ये फसवणुकीचे साम्य आढळून आल्याने आरोपीचा शोधासाठी पोलीस प्रयत्नशील होते. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एन. नारायण, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख जगदीश, कारवार डीवायएसपी गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली व अंकोला पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मठपती यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईनंतर संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत पीएसआय जयश्री प्रभाकर, उदप्पा परेप्पन्नावर, पोलीस कर्मचारी कुमार चंद्र, महादेव सिद्धी, अंबरीश नाईक, मनोज डी., श्रीकांत कटबर, असीफ आर., रयीस बागवान, गुणगा सहभागी झाले होते.









