खानापूर : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. कोल्हापुरातही प्रचार शिगेला पोहचला असून कोल्हापूरच्या मैदानात महाराष्ट्रासह देशातील नेत्यांनी प्रचाराच्या फैरी झाडल्या आहेत. यात राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील महाआघाडीच्या उमेदवारांसाठी झंझावती प्रचार दौरा केला आहे.अंजली निंबाळकर यांनी करवीर मैदानात आपली तोफ डागली. सतेज पाटील यांच्या निवडणुकीच्या आयोजित प्रचारसभेत त्यांनी प्रियांका गांधी यांच्या समवेत युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
तसेच त्यांनी कर्नाटकात पंचहमी योजना राबवताना भाजपाने टीकेचे शस्त्र उभारले. मात्र कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कधी न डगमगता ही योजना यशस्वीरीत्या पेलण्याचे काम केले आहे. मात्र ते भाजपने मोडीत काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आधार देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे लोकशाहीसाठी तसेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यासाठी येत्या 20 तारखेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणावे, असे आवाहन अंजली निंबाळकर यांनी केले आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.









