वार्ताहर/गुंजी
गुंजीसह परिसरात गेल्या चार दिवसांपासून भातकापणीस पुन्हा प्रारंभ झाला असून भातकापणी आणि मळणीला वेग आलेला दिसून येत आहे. यावर्षी सुगी हंगामात वारंवार पाऊस पडत असल्याने भातकापणी खोळंबल्याने लांबणीवर पडली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून या परिसरात भातकापणीपाठोपाठ मळणी कामाला वेग आलेला दिसून येत आहे. पावसामुळे अनेकवेळा भात कापणीमध्ये व्यत्यय झाल्यामुळे सध्या माळपिकांबरोबरच रांग शिवारातीलही भातपिके कापणीची लगबग शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील कांही शेतकरी रामनगर भागातून मजूर आणून कापणी करत असताना दिसून येत आहेत. काही शेतकरी पै पाहुण्यांना बोलावून घेऊन कापणीत गुंतलेला आहे. तर अनेकजण यंत्राने भातकापणी करीत आहेत. मात्र रविवारी सायंकाळपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा द्विधा अवस्थेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.









