वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील सूरजपूर जिह्यात हत्तींच्या कळपाने दोन मुलांना चिरडून ठार केले. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री महेशपूर येथील प्रेमनगर येथील चिटखाई गावात घडली. येथे पांडो जमातीचे एक कुटुंब जंगलात झोपडीत राहत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असतानाच अचानक हत्तींच्या कळपाने या कुटुंबाच्या झोपडीत घुसून घराची संपूर्ण नासधूस केली. यावेळी पांडो कुटुंबातील पती-पत्नी आणि तीन मुलांनी कसेबसे पळून आपला जीव वाचवण्यात यश मिळविले. मात्र बिसू (11) आणि काजल (5) या दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.
हत्तींनी हल्ला केला त्यावेळी झोपडीत सर्वजण झोपले होते. रात्री अचानक हत्तींचा कळप झोपडीजवळ पोहोचला आणि त्यांनी ती पाडण्यास सुऊवात केली. बिखू पांडो आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु मुलांना वाचवण्यासाठी वेळ मिळाला नाही. यादरम्यान हत्तींनी दोन्ही मुलांना चिरडले. हत्तींनी झोपडीत धान्यही फस्त केले. कुटुंबीयांनी कसेतरी गावात पोहोचून तेथेच रात्र काढली. सकाळी ते घटनास्थळी पोहोचले असता झोपडी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आणि शेजारीच दोन्ही मुलांचे मृतदेह पडलेले निदर्शनास आले.









