वार्ताहर/येळ्ळूर
छत्रपती शिवाजी रोड व महात्मा फुले गल्ली यांच्या मधल्या चौकात गेले कित्येक दिवस मातीचा ढिगारा असून वाहतुकीला अडथळा होत आहे. मुख्य म्हणजे हा ढिगारा ग्रामपंचायतीच्या ऑफीससमोरच असून ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि पीडीओ यांच्या नजरेस कसा पडला नाही, याचे आश्चर्य वाटते. मागील महिन्यात या ठिकाणी जलवाहिनी फुटली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यातील ही माती असून जलवाहिनी दुरूस्त झाली. पण मातीचा ढिगारा मात्र तसाच पडून आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असूनही हा ढिगारा इतके दिवस का हलवला गेला नाही, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. की एखाद्या अपघाताची वाट पाहिली जात आहे? वेळीच दखल घेऊन हा मातीचा ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत असून ग्राम पंचायत ऑफीसच्या समोरचा ढिगारा हटवायला महिना लागतो. मग गावातील इतर समस्यांचा निपटारा कसा होत असावा, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.









