वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने एका वरिष्ठ सहाय्यक उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर शाब्दिक वादानंतर गोळ्या घालून ठार केले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कॉन्स्टेबल विक्रमजीत सिंग यांनी आपल्या सर्व्हिस रायफलमधून सब-इन्स्पेक्टर शाहजहान यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते जागीच ठार झाले. शनिवारी या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिरिबाम जिल्ह्यात झालेल्या भांडणाच्या कारणाचा पोलीस सध्या तपास करत आहेत. सध्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या मोंगबांग गावच्या पोलीस चौकीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर आरोपी कॉन्स्टेबलला इतर पोलिसांनी तत्काळ अटक केली.









