वार्ताहर /हिंडलगा
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्योतीनगर भागात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कुत्री टोळक्या-टोळक्यांनी फिरत असून ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धाऊन हल्ला करत आहेत. त्यामुळे कित्येक नागरिक भयभीत झाले आहेत. ही कुत्र्यांची झुंड पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला करून त्यांना जखमी करीत आहेत. तसेच परिसरातील कोंबड्या फस्त करत आहेत. प्राण्यांची हत्या करण्यास शासनाची बंदी आहे. त्यामुळे जनतेने काय करावे हे सूचनासे झाले आहे. या भागातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतला वेळोवेळी कळविले आहे, परंतु अद्याप बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीने याबाबतची दखल घेतली नाही. तरी लागलीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.









