वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे,सांबरा, बाळेकुंद्री खुर्द भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात सुगी हंगामाला प्रारंभ झाला आहे. बासमती भातपीक कापण्यात शेतकरीवर्ग मग्न होता. अशातच मंगळवारपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले तर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापलेल्या भातपिकाचे पाणी साचून नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या पूर्व भागात निम्म्याहून जास्त भातपिके कापणीला आली आहेत. त्यामुळे पावसाच्या उघडीपीची गरज आहे.









