नवी दिल्ली :
आयफोन निर्माती कंपनी अॅपलने निर्यातीच्या बाबतीत गेल्या 6 महिन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्याचे पहायला मिळाले. आयफोन निर्यातीमध्ये 33 टक्के वाढ सहा महिन्यांमध्ये झाली आहे. ब्लूमबर्ग यांनी ही माहिती दिली आहे.
सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या सहा महिन्यात आयफोनची निर्यात 33 टक्के वाढीसोबत 6 अब्ज डॉलर्सची झाली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ही वाढ दिसून आली आहे. या योगे अॅपलने आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातून जे निर्यातीचे दहा अब्ज डॉलर्सचे लक्ष ठेवले होते ते पूर्ण झाले आहे. यामुळे आता कंपनीचे चीनवरचे अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी झालेले पाहायला मिळाले. भारतामध्ये निर्मिती क्षमतेचा केला जाणारा विस्तार निर्यातीसाठी सहाय्यभूत ठरत आहे.
फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे योगदान
भारत सरकारच्या स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सवलतीमुळे त्याचप्रमाणे कुशल मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा या पार्श्वभूमीवर कंपनीने निर्यातीमध्ये उत्तम कामगिरी निभावली आहे. फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून अॅपल कंपनी आयफोन निर्मिती करून घेते. फॉक्सकॉनच्या चेन्नईतील कारखान्यामध्ये आयफोनचे निम्मे उत्पादन घेतले जात असल्याचेही सांगितले जाते. यासोबतच विस्ट्रॉनचा ताबा घेतलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांनी आयफोन निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे. यांचा कारखाना कर्नाटकात असून येथून 1.7 अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात करण्यात आले आहेत.
इतर शहरात विक्री केंद्रे सुरु करणार
अलीकडेच कंपनीने आयफोन 15 प्रो चे उत्पादन भारतातच घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्याची निर्यात केली जात आहे. या सोबतच देशभरातील इतर शहरांमध्ये आपली शोरुम्स उघडण्याची तयारी कंपनी करते आहे.









