युवा समितीच्या बैठकीत निषेध, काळ्यादिनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून कन्नड सक्ती करत व्यापाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. व्यवसायाच्या उद्देशाने लावलेले फलक काढण्याची सक्ती महापालिकेकडून केली जात आहे. व्यापारावरच शहराचा महसूल अवलंबून असल्याने महापालिकेकडून कन्नड सक्तीसाठी सुरू असलेल्या या धोरणाचा म. ए. युवा समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. युवा समितीची बैठक मंगळवारी टिळकवाडी येथील कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर होते. 1 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मूक सायकल फेरीमध्ये शेकडोंच्या संख्येने युवक सहभागी होतील, असा निर्धार करण्यात आला. त्याचबरोबर 1 नोव्हेंबर रोजी काळादिन असल्याने कोणीही आकाशकंदील अथवा विद्युत रोषणाई करू नये, अशा सूचनाही करण्यात आल्या. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, अश्वजित चौधरी, रोहन कुंडेकर, सूरज कुडुचकर, प्रतीक पाटील, वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, विनायक कावळे, बापू भडांगे यांच्यासह इतर उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार मानले.
जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांची घेणार भेट
शाळा हे शिक्षणाचे माध्यम आहे. त्यामुळे याठिकाणी भाषाभेद करणे चुकीचे आहे. परंतु तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कन्नडमध्ये बोलण्याची सक्ती करण्यात आली. तसेच त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. याबद्दल शिक्षण विभागाला जाब विचारला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.









