वार्ताहर/गुंजी
खानापूर-रामनगर महामार्गावर गुंजीनजीक मंगळवारी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन उलटल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारीही गुंजीनजीक एका अवजड ट्रकने झाडाला जोराची धडक दिल्याने अपघात घडला आहे. त्यामुळे या महामार्गावर अवजड वाहनांच्या अपघाताची मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रामनगरहून खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या या भरधाव ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जोराची धडक दिल्याने झाड पडले आहे. त्याचबरोबर सदर ट्रकचेही नुकसान झाले आहे. कित्येक दिवस बंद असलेली अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून खुली करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या महामार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगाने हाकली जात आहेत. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.









