‘कस्तुरीमृग’ हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांना परिचित आहे. हिमालयाच्या परिसरात वास्तव्य असणाऱ्या विशिष्ट प्रजातीच्या हरीणाच्या नाभीत, म्हणजेच बेंबीत अतिशय सुखद सुगंध असणारी कस्तुरी असते. मात्र, ती काढून घेण्यासाठी या हरिणाची शिकार करावी लागते. या शिकारीमुळे हरिणांची ही प्रजाती नामशेष झाली आहे, अशीही माहिती दिली जाते. तर कित्येकांच्या मते कस्तुरीमृग ही केवळ एक कवीकल्पना असून अशा प्रकारची हरिण प्रजाती अस्तित्वातच नसते.
तथापि, गेली 25 वर्षे वनजीवनाचा अभ्यास केलेले एक भारतीय संशोधक अभिषेक यांनी कस्तुरीमृग अस्तित्वात असतो, असे प्रतिपादन केले आहे. ही मृगाची किंवा हरिणाची प्रजाती नेहमीच्या हरिणांच्या प्रजातींपासून भिन्न आहे. इंग्रजीत या प्रजातीला ‘मक्स डिअर’ आणि भारतीय भाषांमध्ये ‘कस्तुरीमृग’ असे संबोधले जाते. ही प्रजाती ‘अँटिलोप’ या मृगवर्गाचा एक भाग आहे. या कस्तुरीमृगाच्या नाभीत एक पोकळी असते. या पोकळीत कस्तुरी नामक सुगंधी द्रव्य भरलेले असते. या कस्तुरीच्या सुगंधासमोर जगातील सर्व उत्तमोत्तम आणि महाग अत्तरेही फिकी पडतील अशी स्थिती आहे. अभिषेक यांच्या म्हणण्यानुसार कस्तुरीमृग जसजसा वयाने मोठा होत जातो आणि वृद्धत्वाच्या दिशेने झुकू लागतो, तशी त्याची कस्तुरी अधिकाधिक सुगंधीत होत जाते. मात्र, कस्तुरीचे हे वरदान केवळ नर मृगालाच लाभलेले असून मादी मात्र यापासून वंचित असते.
या कस्तुरीचा भावही अर्थातच प्रचंड असतो. एक ग्रॅम कस्तुरीचा भाव किमान 30 हजार रुपये असतो. ही कस्तुरी नर मृगाच्या नाभीच्या पोकळीत अर्धघन (सेमीसॉलिड) स्वरुपात, अर्थात, दाट पाकाच्या स्वरुपात अस्तित्वात असते. पाहिल्यावर ती साधारणत: डिंकासारखी दिसते. ती वाळल्यानंतर तिचे स्वरुप एखाद्या स्फटीकासारखे होते. या कस्तुरीतून प्रदीर्घ काळापर्यंत, अर्थात, वर्षानुवर्षे सुगंध येत राहतो. अभिषेक यांचे म्हणणे खरे असेल, तर कस्तुरीमृग ही कवीकल्पना नसून तो निसर्गाचा एक मोठा चमत्कार आहे, असेच म्हणावे लागेल.









