वृत्तसंस्था /नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक फायनल 2024 च्या नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज सोनम उत्तम मस्करने महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात रौप्य पदक पटकाविले.
मंगळवारी झालेल्या या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत चीनच्या हुवांगने सुवर्णपदक पटकाविले. तर 22 वर्षीय सोनमने 252.9 गुण घेत रौप्य पदक मिळविले. फ्रान्सच्या मुलेरने कास्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात सहभागी झालेली भारताची आणखी एक नेमबाज तिलोतमा सेनला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुष आणि महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजी प्रकार घेण्यात आला. या स्पर्धेमध्ये 37 देशांचे सुमारे 131 अव्वल नेमबाज सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमधील वैयक्तिक 12 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सदर स्पर्धेमध्ये भारताच्या 23 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा दिल्लीतील डॉ. कर्णीसिंग नेमबाजी संकुलात मंगळवारपासून सुरू झाली आहे. पेरुमध्ये अलिकडेच झालेल्या कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद झाली असून आयएसएसएफचे प्रमुख रॉसी यांनी भारतीय नेमबाजांचे कौतुक केले आहे. 2025 साली होणाऱ्या कनिष्टांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपला अर्ज यापूर्वीच दाखल केला आहे.









