वृत्तसंस्था/ मुल्तानपूर
यजमान पाक आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या चांगली कामगिरी करण्यासाठी झगडत असलेल्या पाक संघाला या मालिकेत इंग्लंडच्या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजीला तोंड द्यावे लागेल. या सामन्यात इंग्लंडचा नियमित कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे उपलब्ध राहणार नसल्याने त्याच्या जागी ओली पोपकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इंग्लंड संघामध्ये ब्रायडन कार्से आणि गस अॅटकिन्सन हे नव्या दमाचे वेगवान गोलंदाज आहेत. कार्सेचे या सामन्यात कसोटी पदार्पण होणार आहे. तर अॅटकिनसनची विदेशी दौऱ्यातील ही पहिलीच मालिका आहे. अॅटकिनसनने मायदेशात झालेल्या विंडीज आणि लंका विरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. पाकमधील खेळपट्ट्यांवर तो प्रभावी गोलंदाजी करु शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अष्टपैलू ख्रिस वोक्सच्या कामगिरीवर इंग्लंडची भिस्त राहिल. अलिकडच्या कालावधीत बेन स्टोक्सला सलग चार कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळता आले नाही. दरम्यान तब्बल अडीच वर्षानंतर अष्टपैलू वोक्स आपली पहिली कसोटी खेळत आहे. 2016 मध्ये आशियात त्याने पहिली कसोटी खेळली होती. इंग्लंड संघामध्ये मॅथ्यू पॉट्स आणि ओली स्टोन यांना आता कार्सेची साथ गोलंदाजीत लाभेल.
पोपच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मायदेशात लंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. 2022 च्या दौऱ्यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. या मालिकेसाठी इंग्लंड संघामध्ये जॅक लिच आणि शोएब बशिर या फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडने 2022 साली केलेल्या पाकच्या दौऱ्यामधील कसोटी मालिकेत लिचने 15 गडी बाद केले होते.
या मालिकेसाठी पाक संघाने आपली फलंदाजीची बाजू अधिक भक्कम केली असून पहिल्यांदाच अष्टपैलू अमीर जमालला संघात स्थान देण्यात आले आहे. अमीर जमालची ही बांगलादेशविरुद्धच्या पाकमध्ये झालेल्या कसोटी मालिकेनंतरची पहिली कसोटी आहे. बांगलादेशने पाकचा त्यांच्या भूमीवर 2-0 असा व्हाईटवॉश कसोटी मालिकेत केला असल्याने शान मसूदच्या कर्णधार पदाची सत्वपरीक्षा ठरेल. कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शान मसूदने आतापर्यंत सर्व म्हणजे पाचही कसोटी सामने गमाविले आहेत. मसूदच्या नेतृत्वाखाली पाकला ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 3-0 अशी गमवावी लागली होती. अमीर जमालच्या पुनरागमनामुळे पाकचा संघ या मालिकेत चांगली कामगिरी करेल अशी आशा मसूदने व्यक्त केली आहे. अमीर जमाल, अब्रार आणि सलमान हे पाक संघातील फिरकी गोलंदाज आहेत. पाक संघाने 2021 च्या प्रारंभानंतर आजपर्यंत एकही कसोटी मालिका घरच्या भूमीवर जिंकलेली नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांकडून पाकला आपल्या भूमीवर मालिका गमवाव्या लागल्यानंतर पाकने न्यूझीलंड बरोबरची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळविले होते.