वृत्तसंस्था / बिजिंग
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या चायना खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने एकेरीची अंतिम फेरी गाठताना स्पेनच्या बेडोसाचा पराभव केला. त्याचप्रमाणे शांघाय पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा सिनेर आणि स्पेनचा अल्कारेझ यांनी शानदार विजय नोंदविले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गॉफने बेडोसाचा 4-6, 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती क्वीनवेन आणि झेकची मुचोव्हा यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर रविवारी गॉफचा अंतिम सामना खेळविला जाईल. गॉफला उपांत्यफेरीचा सामना जिंकण्यासाठी तब्बल अडीच तास झगडावे लागले.
शांघाय मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीचा सिनेर आणि स्पेनचा अल्कारेझ यांनी विजयी सलामी दिली. स्पेनच्या द्वितीय मानांकित अल्कारेझने चीनच्या शेंग जुनचेंगचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला. तर दुसऱ्या एका सामन्यात सिनेरने जपानच्या डॅनियलवर 6-1, 6-4 अशी मात करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या मेनसीकने रुब्लेव्हचा 6-7(5-7), 6-4, 6-3 याचप्रमाणे जपानच्या वेटानुकीने नेकासीमाचा 7-6(7-4), 6-3 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या पॉपी रीनने सर्बियाच्या केमॅनोव्हीकचा 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









