वृत्तसंस्था/ लिमा, पेरू
मुकेश नेलावल्ली, राजवर्धन पाटील व हरसिमर सिंग रथ्था या भारतीय त्रिकुटाने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजीमध्ये पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल सांघिक नेमबाजीचे सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे 11 वे सुवर्ण आहे.
मुकेशचे हे या स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक असून त्यात 25 मी. पिस्तूल नेमबाजीतील वैयक्तिक सुवर्णपदकाचाही समावेश आहे. पदकतक्त्यात भारत 16 पदकांसह अग्रस्थानी कायम आहे. त्यात एक रौप्य व चार कांस्यपदकांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावरील चीनने 3 सुवर्ण, एक रौप्य मिळविले आहे.
वैयक्तिक अंतिम फेरीत मुकेश व राजवर्धन यांनी स्थान मिळविले. पण पहिल्या सहा सिरीजमध्ये 17 अचूक वेध घेत राजवर्धनला चौथे स्थान मिळाले. मुकेश त्याआधीच बाहेर पडला. त्याला 25 पैकी 10 वेध घेता आले. कनिष्ठ पुरुषांच्या 50 मी. रायफल प्रोन प्रकारात परिक्षित सिंग ब्रारने 623.0 गुण नोंदवले. शिवेंद्र बहादुर सिंगने 618.4 गुणांसह 14 वे तर वेदांत नितिन वाघमारेने 613.2 गुणांसह 24 वे स्थान मिळविले.









