कारवार जिल्हा पालकमंत्री-मासेमारी-बंदर विकासमंत्री मंकाळू वैद्य यांची माहिती : बेटांचीही प्रगती करण्याची आवश्यकता
कारवार : कारवार जिल्ह्यातील बीच टुरीझम, टेंपल डुरीझम, नद्यामध्ये डुरीझमचा विकास घडवून आणण्यासाठी मोठी संधी आहे. वनखात्याच्या आणि सीआयझेड नियमांचे पालन करून जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाचा विकास घडवून आणण्यात येईल, अशी माहिती कारवार जिल्हा पालकमंत्री आणि मासेमारी व बंदर विकास मंत्री मंकाळू वैद्य यांनी दिली. ते येथील एका खासगी हॉटेलमध्ये पर्यटन खाते आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक पर्यटन दिनाच्या सांगता सोहळ्यात बोलताना सांगितले.
राज्य सरकारकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल्स उभारण्याचा विचार सुरू आहे. सदर हॉटेल्स एकतर राज्य सरकारकडून सुरू करण्यात येतील किंवा पीपीपी तत्वावर सुरू करण्यात येतील. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मंगळूर येथे 1500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बंदरांचा विकास घडवून आणण्यात येत आहे, अशी माहिती देवून वैद्य पुढे म्हणाले, कारवार जिल्ह्यातील अंकोला येथे विमानतळाचा विकास घडवून आणल्यानंतर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. राज्याच्या किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायाला बढावा देण्यासाठी मंगळूरपासून कारवारपर्यंत तेरा बेटांचा विकास घडवून आणण्यात येईल असे सांगितले.
विकास करताना समस्या येण्याची शक्यता
याप्रसंगी बोलताना कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल म्हणाले, जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाचा विकास घडवून आणण्याची फार मोठी संधी आहे. तथापि, पर्यटनाचा विकास घडवून आणताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारवार तालुक्यातील तीळमाती समुद्रकिनाऱ्याचा विकास घडवून आणणे शक्य झालेले नाही. सीआरझेड नियमांमुळे येथून जवळच्या काळीनदी आणि अरबी समुद्र संगम प्रदेशाच्या विकास घाणण्यात आला नाही. त्या शिवाय गंगावळी, शरावती, अनघाशिनी या नद्यांचे संगम प्रदेशाचा विकास घडवून आणणे गरजेचे आहे. राज्याच्या किनारपट्टीवर पर्यटनाला वाव देण्यासाठी बेटाचा विकास घडवून आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
चित्रकला-वाळू शिल्प स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत
यावेळी जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांचे समयोचित भाषण झाले. विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर, कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी ईश्वर कांदू व्यासपीठावर उपस्थित होते. पर्यटन खात्याचे साहाय्यक संचालक जयंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चित्रकला आणि वाळू शिल्प स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे वितरीत करण्यात आली.