वृत्तसंस्था / कराची
यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाचे बुधवारी पाकमध्ये आगमन होणार आहे. अलिकडेच पाक संघाला घरच्या भूमीवर बांगलादेशकडून व्हाईटवॉश स्वीकारावा लागल्याने कर्णधार शान मसुदची पीसीबीकडून चांगलीच कानउघडणी करण्यात आली आहे.
इंग्लंड आणि पाक यांच्यातील पहिली कसोटी 7 ऑक्टोबरपासून मुल्तानमध्ये खेळविली जाणार आहे. मुल्तानमध्ये या मालिकेतील पहिले दोन सामने होणार असून त्यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडीत खेळविला जाईल. या मालिकेत पाक संघाची खरी सत्वपरीक्षा ठरणार आहे. बांगलादेशकडून पराभवाची नामुष्की पत्करल्याने या आगामी मालिकेत पाक संघावर निश्चितच मानसिक दडपण राहिल.









