अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे लहान मुली-महिलांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. ठाणे पोलिसांच्या कर्तबगारीमुळे आज त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुऊ आहे. मात्र या एन्काउंटरवर अनेक शंका-कुशंका घेण्यास सुऊवात झाली आहे. एन्काउंटरचा पूर्वइतिहास पाहता तो रक्तरंजीत असाच आहे. यामुळे हा एन्काउंटर देखील ठाणे पोलिसांना घाम आणणार हे नक्की.
बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्यानंतर सर्व स्तरातून ठाणे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव सुऊ आहे. कौतुकाच्या स्तुतिसुमनाबरोबरच आरोपांचे वार आणि प्रत्यारोपांच्या फैरीदेखील सुऊ झाल्यात. अक्षय शिंदे याचा एन्काउंटर म्हणजे राज्यातील विकृतांना बसलेला जबर धक्का आहे. तर अनेक मुली-महिलांना मिळालेला एक दिलासा आहे. या एन्काउंटरमुळे राज्यातील जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याला राजकीय वळण देत हा एन्काउंटर म्हणजे एक हत्या आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न सुऊ झालाय. राज्य पोलिसांची त्यातल्या त्यात ठाणे पोलिसांची तुलना उत्तर प्रदेश पोलिसांसारखी करण्यास सुऊवात झाली आहे. कारण अशा प्रकारच्या एन्काउंटरची मोड्स ऑपरेंडी ही युपीच्या पोलिसांची असल्याचा आरोप विरोधकांकडून सुऊ आहे. वास्तविक एन्काउंटरचा इतिहास पाहिला तर तो रक्तरंजीत असल्यासारखा आहे. यामध्ये कित्येक गुंडांचा खात्मा तर झालाच मात्र अनेक एन्काउंटर हे नकली एन्काउंटर असल्याने, पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील यातून सुटले नाहीत.
नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डचा दबदबा होता. प्रत्येक गल्लीत कोणत्या ना कोणत्या गुंडाचा हस्तक होता. संपूर्ण मुंबईवर वर्चस्व कोणाचे? यातून खुले आम गँगवॉर सुऊ होतं. यामध्ये अनेक मुंबईकर देखील मारले जात होते. अशातच हे गँगवॉर संपविण्यासाठी मुंबई पोलिसांनी एन्काउंटर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले. यावेळी मुंबईतील पहिला एन्काउंटर इसाक बागवान यांनी मन्या सुर्वेचा केला. या एन्काउंटरमुळे बऱ्यापैकी गँगवॉर नियंत्रणात येईल असा समज मुंबई पोलिसांचा होता. मात्र 1998 मध्ये गुंडांनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 101 जणांची हत्या केली होती. 1999 मध्ये गुंडांच्या रक्तरंजीत कारवायांत 47 जण ठार झाले. मुंबईतील गँगवॉर पूर्णत: उफाळून आल्यानंतर मुंबई पोलिस दलातील धडाकेबाज अधिकाऱ्यावर एन्काउंटरच्या ब्रम्हास्त्राची जबाबदारी सोपविली. विजय साळसकर, दया नायक, प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा एकापेक्षा एक सरस अधिकाऱ्यांमुळे अंडरवर्ल्डची भंबेरी उडण्यास सुऊवात झाली. मुंबईत दिवसाला अंडरवर्ल्डच्या शूट आऊटमध्ये एकाचा तरी मफत्यू व्हायचा, अशा काळात या अधिकाऱ्यांनी दहशत प्रस्थापित केली. गुन्हेगारी टोळ्यांची वाढती दहशत पाहून तत्कालीन पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी कडक धोरण स्वीकारले.
त्याचे फलस्वरूप म्हणून 1999 मध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 83 गुंड मारले गेले. त्यामुळे गुन्हेगारांनीही धसका घेतला. 2000 मध्ये पोलिस चकमकीत 73 गुंड मारले. मात्र यादरम्यान, अंडरवर्ल्डने शिवसेनेच्या अनेक नेत्यांना टार्गेट करण्यास सुऊवात झाली. अक्षरश: या नेत्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर खुलेआम गोळ्या झाडण्यास सुऊवात झाली. अंडरवर्ल्डच्या या हल्यात शिवसेना नगरसेविका नीता नाईक, शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण, बबन सुर्वे, रमाकांत हडकर, रिपाइंचे रागो मकवाना यांच्यासह 24 जणांच्या हत्या केल्या. यामुळे ही दहशत मोडून काढण्यासाठी एन्काउंटर स्पेशालिस्टनी जोरदार एन्काउंटर करीत 2001 मध्ये 94 गुंड मारले. मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील हा उच्चांक होता. त्यानंतर 2002 मध्ये 47 गुंडांचा चकमकीत खात्मा झाला. त्यावेळी एन्काउंटर स्पेशलिस्ट, चकमक फेम म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची एक फळी मुंबई पोलिस दलात होती. त्यांनी 272 गुंडांना यमसदनी धाडले आहे. त्यात छोटा राजन टोळीच्या 97 गुंडांचा, तर दाऊद टोळीच्या 46 गुंडांचा समावेश आहे. या चकमकफेम अधिकाऱ्यांतील काहींच्या नावावर शतक आहे. काही शतकांच्या उंबरठ्यावर, तर काहींनी अर्धशतक पार केले आहे.
त्यात अग्रक्रमाने नावे घेतली जातात ती प्रदीप शर्मा, दया नायक, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, यांची. प्रदीप शर्मा यांनी एन्काउंटरचे शतक साजरे केले होते. तर प्रफुल्ल भोसले यांच्या नावावर 85 एन्काउंटरची नोंद आहे. विजय साळसकर यांनी तर अख्खी अऊण गवळी आणि अमर नाईक टोळी संपवली होती. रवींद्र आंग्रे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात हैदोस घालणारी मंचेकर टोळी रसातळाला नेली. 272 पैकी 90 टक्के एन्काउंटर विजय साळसकर, प्रदीप शर्मा आणि प्रफुल्ल भोसले या तीन अधिकाऱ्यांनी मिळून केले होते. त्यातील विजय साळसकर यांना मुंबई हल्ल्यात वीरमरण आले. प्रदीप शर्मा यांना लखन भैया एन्काउंटर भोवले. तर ख्वाजा युनूस प्रकरणात भोसले अडकले. त्यानंतर शर्मा व भोसले हे पुन्हा पोलीस दलात ऊजू झाले. भोसले पोलीस दलातून सेवानिवफत्त झाले आहेत. तर निवफत्तीनंतर प्रदीप शर्मा अॅन्टेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अडकले.
मुंबई शहरात सरसकट एन्काउंटर सुऊ असतानाच या सर्वावर नजर होती ती मानवाधिकार आयोगाची. तसेच यांच्या हितशत्रु आणि राजकीय वैरी देखील या एन्काउंटर स्पेशालिस्ट यांच्यावर टपुन बसले होते. त्यातच लखनभैय्या एन्काउंटर व ख्वाजा युनुस एन्काउंटरनंतर हे स्पेशालिस्ट थंड झाले. पोलीस चकमकींविरोधात भारतात कोणताही कायदा नसला तरी, पोलीस चकमकींच्या विश्वासार्हतेबद्दल आणि कायदेशीरतेबद्दल वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून न्यायालये तसेच मानवाधिकार आयोगाने वाढत्या चकमकींबाबत चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने तर अशा हत्या या न्यायबाह्य मानून त्या घडवून आणणारे पिस्तुल प्रेमी पोलीस फाशीस पात्र असल्याची टिप्पणी एका प्रकरणाच्या निमित्ताने केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीतून पोलीस चकमकींचे कायदेशीर चौकटीतील स्थान अधोरेखीत झाले होते.
प्रकाश कदम विऊद्ध रामप्रसाद विश्वनाथ गुप्ता प्रकरणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या बनावट चकमकी म्हणजे थंड डोक्याने केलेल्या हत्याच आहेत. तसेच, अशी बनावट चकमक करणाऱ्यांना दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरण म्हणून फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली होती. न्यायालय एवढ्यावरच थांबले नाही, तर चकमकीच्या नावाखाली हत्या करणाऱ्या एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिसांना वाटते की त्यांना कोणी हात लावू शकणार नाही. परंतु, शिक्षा त्यांचीही वाट पाहत आहे हे त्यांना कळले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले होते. यामुळे 2011 साली मुंबईत अमर नाईक टोळीच्या गँगस्टरचा शेवटचा एन्काउंटर अजय चव्हाण या पोलिस अधिकाऱ्याने केला. त्यानंतर हे एन्काउंटर म्यान करण्यात आले. ते अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवेळी बाहेर काढले. एन्काउंटरचा रक्तरंजीत इतिहास पाहता हा एन्काउंटरदेखील पोलिसांना सोपा जाणार नाही, हे मात्र नक्की.
– अमोल राऊत