वृत्तसंस्था/नवी दिल्ली
माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर हिला गुऊवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पूजाच्या अटकेपासून अंतरिम संरक्षणाची मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याच्या आरोपाखाली पूजाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पूजाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी पूजाच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर अटकपूर्व जामीन मागणाऱ्या पूजाच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली. याचिकाकर्त्याच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर आता हे प्रकरण 4 ऑक्टोबरला सूचीबद्ध करावे. तोपर्यंत कारवाईचा अंतरिम आदेश सुरू राहील, असे न्यायमूर्तींनी घोषित केले. माजी आयएएस पूजा खेडकर हिच्यावर 2022 च्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.









