परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचे विधान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे अशी भारताची इच्छा आहे. त्यामुळेच भारत या दोन देशांमधील दुवा बनला आहे. दोन्ही देशांचे शांतताविषयक निरोप एकमेकांना पोहोचवायचे, हे उत्तरदायित्व सध्या भारताने स्वीकारले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून यातूनच अंतिमत: शांततेचा दरवाजा उघडणार आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी केले आहे.
भारताने युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांसह या संघर्षासंबंधी सविस्तर चर्चा केली आहे. तसेच या चर्चेची माहिती दोन्ही देशांना दिली आहे. याचा अर्थ असा की, युकेनशी आम्ही काय बोललो, ते रशियाला माहिती आहे. तर रशियाशी झालेली आमची चर्चा युक्रेनलाही ठावूक आहे. चर्चा प्रक्रियेत पारदर्शित्व रहावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. युव्रेनच्या मनात रशियासंबंधी काय भाव आहेत आणि रशियाच्या मनात युव्रेनसंबंधी काय चालले आहे, हे एकमेकांना माहिती असणे आवश्यक आहे. निरोपांच्या या देवाणघेवाणीतूनच शांततेचे लक्ष्य साध्य केले जाऊ शकते. म्हणून भारताने हे उत्तरदायित्व स्वीकारले असे त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युकेनचे अध्यक्ष वॉल्दीमीर झेलेन्स्की यांच्याही संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या बैठकीच्या निमित्ताने चर्चा केली होती. त्यानंतर एक दिवसांनी जयशंकर यांनी हे विधान केले. भारताच्या भूमिकेचे कौतुक युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांनी केलेले आहे. या दोन्ही देशांना एकमेकांचे निरोप एकमेकांना पोहचविण्यासाठी अशा एका दुव्याची आवश्यकता होतीच. भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध असल्याने आमच्यावर नैसर्गिक रितीने हे उत्तरदायित्व सोपविण्यात आले. ही प्रक्रिया उभयपक्षी लाभाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही रशियाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. भारत चर्चेचे आणि सामोपचाराचे विविध मार्ग धुंडाळत आहे. असे केल्यानेच या प्रकरणातली जटीलता दूर होणार आहे. संयम हा या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा भाग आहे, अशी मांडणी जयशंकर यांनी यावेळी केली.
काही तज्ञांच्या मनात प्रश्न
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात भारताची नेमकी भूमिका काय आहे, हा प्रश्न काही तज्ञांनी मध्यंतरीच्या काळात उपस्थित केला होता. भारत केवळ पोस्टमन म्हणून काम करणार की निर्णय प्रक्रियेतही सहभागी होणार, अशी खोचक पृच्छाही काही तज्ञांनी केलेली आहे. तथापि, या प्रक्रियेची कठीणता आणि जटिलता लक्षात घेता हा गुंता हळूहळूच सोडवायचा असून जे देश दुवा म्हणून काम करत आहेत, त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनविणे योग्य होणार नाही. त्यामुळे भारताची सध्याची भूमिका भारताचे स्थान काय या विषयीची नसून ती शांततेचे लक्ष्य कसे साध्य करता येईल, हे पाहण्याची आहे, असे उत्तर देण्यात आले आहे.