पक्षाचा प्रश्न आल्यास आम्ही सर्वजण एकत्रच : मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही समन्वयाचा अभाव नसून, जुने व नवे कार्यकर्ते असा भेदभाव नाही. येथे कार्यरत असलेला सर्वांचा काँग्रेस पक्ष एकच असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. अथणी येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपल्या पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा असमन्वय नसून, पक्षाचा प्रश्न आल्यास आम्ही सर्वजण एकत्र असतो. आमच्यामध्ये मूळ काँग्रेस नेते व नंतर आलेले काँग्रेस नेते असा भेदभाव नसतो. सर्वांची वेळ नक्कीच येते. योग्य वेळेसाठी सर्वांनी प्रतीक्षा करावी. पक्ष सक्षम करण्यासाठी गजानन मंगसुळी व सदाशिव भुटाळे यांची जबाबदारी वाढली आहे. मंगसुळी यांना राजकीय संधी पुन्हा लाभणार असल्याचे सांगितले.
कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पीक नुकसानभरपाईबाबत बोलताना त्यांनी कृष्णा नदीच्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली आहे. पण प्रामुख्याने ऊस हे व्यापारी पीक असल्याने त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. शिवाय उर्वरित पिकांचाही सर्वेक्षण करावे लागणार आहे. अद्याप शेतामध्ये पुराचे व अतिवृष्टीचे पाणी असल्याने सर्वे कार्याला विलंब होत आहे. सरकारच्या नियमानुसार भरपाईची रक्कम दिली जाईल असे सांगितले.
तेथील प्रशासन जागृत असणे आवश्यक
ते म्हणाले धर्मादाय खात्याकडून देवालयांची मुक्तता होण्यासाठी मंत्रालयाच्या श्रींनी विचार व्यक्त केल्याबद्दल त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. तो एक सार्वजनिक विचार असून सरकारचा त्याच्याशी संबंध नाही. सर्व देवालये स्वतंत्र आहेत. केवळ काही देवालय मात्र सरकारच्या अधिपत्याखाली असून ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची देखभाल केली जाते. तिऊपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा अंश आढळल्याच्या बाबतीत विचारले असता त्यांनी गोकाक, अथणी परिसरात आपण असून तेथील प्रकाराबाबत आपण कसे सांगू शकणार. मात्र तेथील प्रशासन जागृत असणे आवश्यक होते. आपल्या भागात असा प्रकार घडल्यास व कोणीतरी तक्रार केल्यास त्याबाबत तातडीने क्रम घेण्यात येईल. राज्यात पॅलेस्टाईन ध्वज फडकवण्याची प्रकरणे घडत असल्याबाबत त्यांनी सर्व मुस्लीम राष्ट्रीय भारताचे शत्रू नसून, भारतासोबत काही मुस्लीम देशाचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत. प्रत्येक घटनेला एकाच नजरेतून पाहू नये. देश विरोधी हालचाली केल्यास क्रम घेता येईल. याबाबत आपले पोलीस खाते दक्ष आहे.
कायद्याच्या चौकटीमध्येच आरक्षणाबाबत निर्णय
पंचमसाली आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी कायद्याच्या चौकटीत कोणत्या प्रकारे चर्चा करता येते ती करता येईल. मागील सरकारने याबाबत काहीही केलेले नाही. कायद्याच्या अखत्यारीत कोणत्या रीतीने याला पर्याय आहे ते पाहावे लागेल. प्रामुख्याने अनेक आंदोलने करूनही यत्नाळांना देखील आरक्षण मिळवून देता आलेले नाही. पूर्वीच्या सरकारने काय केले हा प्रश्न उभा आहे. तातडीने आरक्षण देता येणार नाही. कायदा आपल्या हातात नसून त्याच्या चौकटीमध्येच आरक्षणाबाबत निर्णय घेता येणे शक्य असल्याची त्यांनी सांगितले.









