स्वत:च्या अपत्यावर संकट आले तर आई त्याची ढाल होत रक्षण करत असते. ओटीटीची ‘हसीन दिलरुबा’ तापसी पन्नू आता काही याच शैलीत अॅक्शन करताना दिसून येणार आहे. तिचा नवा चित्रपट ‘गांधारी’ची घोषणा झाली आहे. या चित्रपटाची कथा एका आईची असून जिच्या सूडाग्नीत सर्वकाही भस्म होत असल्याचे दाखविले जाणार आहे. कनिका ढिल्लननेच तापसीला ‘हसीन दिलरुबा’त स्थान दिले होते आणि आता तिच तापसीला ‘गांधारी’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.
ही एक इमोशनल-अॅक्शन-ड्रामा फ्रेंचाइजी असणार आहे. कनिका आणि मी काही तरी वेगळे करण्यासाठी पुन्हा एकत्र येत आहोत. कनिकाने पहिल्यांदाच अॅक्शनपटाची कहाणी लिहिली असल्याचे तापसीने नमूद पेल आहे. कनिका आणि तापसी दीर्घकाळापासून मैत्रिणी आहेत. आतापर्यंत दोघींनी हसीन दिलरुबा, रश्मि रॉकेट, डंकी आणि फिर आई हसीन दिलरुबा यासारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे.
कनिकाने गांधारी या चित्रपटाची कहाणी ऐकविल्यावर मी होकार दिला. हा चित्रपट हेरांवर आधारित नाही. सूड उगवू पाहणाऱ्या एका मातेची यात कहाणी असल्याचे तापसीने सांगितले आहे. तापसी अॅक्शनमध्ये अत्यंत चांगली आहे. अॅक्शन पार्टला पूर्णपणे निभावू शकणाऱ्या मोजक्या अभिनेत्री असून त्यात तापसीचा समावेश असल्याचे उद्गार कनिकाने काढले आहेत.









