वीरभद्र हेद्दुरशट्टी यांची माहिती : दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
संकेश्वर : नवसाचा राजा निलगारचे गुरुवार 26 रोजी रात्री येथील हिरण्यकेशी नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. भाविकांनी आगामी काळात दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरभद्र हेद्दुरशट्टी यांनी केले आहे. शनिवारी संकष्टी असल्यामुळे तसेच रविवारी सुटी असल्याने भाविकांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. 7 सप्टेंबरपासून आजतागायत सुमारे 15 दिवसांच्या काळात 3 लाख भाविकांनी राजा निलगारच्या दर्शनाचा लाभ घेतला. प्रतिवर्षी पेक्षा यंदा भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष करुन महाराष्ट्र, कोकण व गोवा या भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. यामुळे कोल्हापूर, बेळगाव व गोवा या भागातून येणाऱ्या बसेसना मोठी गर्दी होताना दिसत आहे.
मिठाई, पेढे, फुलाचे हार यासह पाळणे इत्यादी स्टॉलनी लक्ष्मी ओढ्यातील मैदानावर मोठी गर्दी केली असून भाविक दर्शनासह मनोरंजनाचाही लाभ घेत आहेत. वाढत्या गर्दीमुळे शहरातील हॉटेल, खानावळींना गर्दी झाली आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले असून आर्थिक कमाई वाढली आहे. पेढ्याचा महानैवद्य असल्यामुळे पेढ्याची विक्री वाढली असून दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे. दर्शनासाठी अवघे 5 दिवस उरल्यामुळे मिळेल त्या वाहनाने भाविक संकेश्वरात दाखल होत आहेत. बुधवारी कांही संघटनाकडून लक्ष्मी समुदाय भवनात भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली आहे. शनिवारी संकष्टीनिमित्त कांही भक्तांनी खिचडीचे वितरण केले. शनिवारी दुपारनंतर तसेच रविवारी सुट्टी असल्यामुळे भाविकांच्या गर्दीत झपाट्याने वाढ झाली होती.









