रचिन रवींद्रचे नाबाद अर्धशतक, अझाज पटेलचे सहा बळी, दोन्ही संघांना जिंकण्याची संधी
वृत्तसंस्था/ गॅले
यजमान लंका आणि न्यूझीलंड यांच्यात येथे सुरु असलेली पहिली क्रिकेट कसोटी रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. न्यूझीलंड संघाला शेवटच्या दिवशी विजयासाठी केवळ 68 धावांची गरज असून लंकेला विजयासाठी केवळ 2 बळी मिळविण्याची गरज आहे.
या कसोटी सामन्यात लंकेने पहिल्या डावात 305 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 340 धावा जमवित 35 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर लंकेने दुसऱ्या डावात 309 धावा जमवित न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 275 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 8 बाद 207 धावांपर्यंत मजल मारली आहे.
लंकेने 4 बाद 237 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 6 गडी 72 धावांमध्ये बाद झाले. लंकेच्या दुसऱ्या डावात करुणारत्नेने 127 चेंडूत 6 चौकारांसह 83, चंडीमलने 150 चेंडूत 6 चौकारांसह 61, मॅथ्यूजने 111 चेंडूत 5 चौकारांसह 50, डिसिल्व्हाने 4 चौकारांसह 40 आणि कुशल मेंडीसने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे एझाज पटेलने 90 धावांत 6 तर ओरुरकेने 49 धावांत 3 तर सँटनरने 51 धावांत 1 गडी बाद केला.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावामध्ये लंकेच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत दडपण आणले. दरम्यान रचिन रवींद्रने एका बाजूने चिवट फलंदाजी करत लंकेसमारे मोठा अडथळा निर्माण केला आहे. रचिन रवींद्र 158 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 91 धावांवर खेळत आहे. लॅथमने 68 चेंडूत 2 चौकारांसह 28, विलियमसनने 46 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30, ब्लंडेलने 43 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. लंकेतर्फे रमेश मेंडीस आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी 3 तर असिता फर्नांडो आणि धनंजय डिसिल्व्हा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. न्यूझीलंडच्या विजयासाठी प्रामुख्याने रचिन रवींद्रवर भिस्त आहे. लंकेत अध्यक्षीय निवडणुकीमुळे या सामन्यात शनिवारी विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. न्यूझीलंडचे आता केवळ 2 गडी खेळावयाचे आहेत. अझाज पटेल आणि ओरुरके यांच्याकडून रचिन रवींद्रला साथ मिळणे गरजेची आहे. तर मेंडीस आणि जयसूर्या यांची फिरकी निर्णायक ठरु शकेल.
संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव 305, न्यूझीलंड प. डाव 340, लंका दु. डाव 94.2 षटकात सर्व बाद 309 (करुणारत्ने 83, चंडीमल 61, मॅथ्यूज 50, डिसिल्व्हा 40, कुशल मेंडीस 23, अवांतर 25, एझाज पटेल 6-90, ओरुरके 3-49, सँटनर 1-51), न्यूझीलंड दु. डाव 68 षटकात 8 बाद 207 (रचिन रवींद्र खेळत आहे 91, विलियमसन 30, लॅथम 28, ब्लंडेल 30, रमेश मेंडीस, प्रभात जयसूर्या प्रत्येकी 3 बळी, असिता फर्नांडो व धनंजय डिसिल्व्हा प्रत्येकी 1 बळी).