वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलच्या सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवरील सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आल्यावर अमेरिकन कंपनी रिपल लॅबच्या क्रिप्टोकरन्सीची जाहिरात करणारे व्हिडिओ दाखवले गेले होते. हा प्रकार गुरुवारी रात्रीपासूनच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी दिवसभर हे चॅनेल याच स्थितीत होते. या चॅनेलवरून सर्वोच्च न्यायालयातील कारवाई न दिसता काही आभासी चलनांच्या जाहिराती दिसू लागल्यानंतर या प्रकाराकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने या प्रकाराची गंभीर नोंद घेत राष्ट्रीय माहिती केंद्राकडे हा मुद्दा उपस्थित केला होता.









