वृत्तसंस्था / कोलंबो
येत्या ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातमधील दुबई आणि शारजा येथे होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट लंकेने 15 सदस्यांचा महिला क्रिकेट संघ जाहीर केला असून चमारी अटापटूकडे कर्णधारपद सोपविले आहे.
गेल्या जुलै महिन्यात झालेल्या महिलांच्या पहिल्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या लंकन महिला संघाचे नेतृत्व चमारी अटापटूने केले होते. या स्पर्धेत लंकन महिला संघाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. आशिया चषक जिंकणाऱ्या लंकन महिला संघातील खेळाडूंचा या आगामी स्पर्धेसाठी संघात समावेश अधिक प्रमाणात करण्यात आला आहे. नवोदित इनोका रणवीराचा संघात समावेश झाला आहे. रणवीरा ही डावखुरी फिरकी गोलंदाज असून संयुक्त अरब अमिरातमधील खेळपट्ट्यावर ती प्रभावी ठरेल, असा अंदाज आहे. सदर आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दुबई शारजा येथे 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळविली जाणार आहे. आयसीसीची ही नववी स्पर्धा आहे. या स्पर्धेतील प्राथमिक गटातील सर्व सामने 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले जातील. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबरला होणार असून 20 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळविला जाईल. लंकन महिला संघाचा या स्पर्धेसाठी अ गटात समावेश असून या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान यांचा समावेश आहे. लंकेचा या स्पर्धेतील पहिला सामना 3 ऑक्टोबरला पाक बरोबर होणार आहे.









