आणखीन 146 मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेश आगमन आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत नियम डावलून साऊंड सिस्टीम लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी शहरातील पाच पोलीस ठाण्यात गुरूवारपर्यंत 63 मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर सुमारे 146 मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
साऊंड सिस्टीमच्या आवाजामुळे लोकांच्या श्रवणशक्तीवर मोठा दृष्परिणाम होऊ लागला आहे. याची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. गणेशोत्सवामध्ये नियम डावलून शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मोठ्या धुमधडाक्यात साऊंड सिस्टीम लावला होता. त्या आवाजाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याची दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे काम सुऊ आहे.
शहरातील करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी या पाच पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडळाच्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम लावला होता त्या मंडळांची नावे नोंद कऊन त्यांनी लावलेल्या साऊंड सिस्टीमच्या आवाजाची ध्वनिमापक यंत्रावर नोंद घेतली. या नोंदीवेळी शहरातील 209 मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लघंन केल्याचे समोर आले. याची दखल घेऊन शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात 31, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 9, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 13, शाहूपुरी पोलीस ठाण्यात 10 अशा 63 मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण केल्याबाबतचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर आणखीन 146 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुऊ आहे. त्यांच्यावर आठवडाभरात गुन्हे दाखल होणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.