मंडळांमध्ये निष्कारण स्पर्धा-चुरस निर्माण
बेळगाव : उत्सवापूर्वी प्रशासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जातात. पोलीस स्थानकांमध्ये शांतता समितीच्या बैठका होतात. उत्सव शांतपणे व डीजेमुक्त करण्याबाबत चर्चा होतात. परंतु प्रत्यक्षात विसर्जन मिरवणुकीवेळी याचा सर्वांनाच विसर पडतो आणि डीजेचा गोंगाट सुरूच राहतो. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणाहून जाताना तरी आवाजाची मर्यादा कमी करावी, इतपत भानही राहत नाही. लहान मुलांच्या हॉस्पिटलबाबतसुद्धा हे भान बाळगले जात नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अपवाद वगळता बहुसंख्य मंडळांनी बिनदिक्कत डीजेचा वापर मुक्तपणे केला. गणेशोत्सव म्हटला की, महिनाभर आधी वर्गणी गोळा करण्यास सुरुवात करतात. आता उत्सव केवळ वर्गणीवर साजरा होत नाही.
मंडळांना राजकीय आश्रय आणि मदत मिळते. त्यातूनच डीजे सुरू करण्याचे प्रस्थही वाढते. डीजेचे भाडे लाखाच्या पलीकडे असते. उत्सवाचा मूळ हेतू मागे पडून मंडळांमध्ये मूर्तीची उंची, राजकीय नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या भेटी याची चढाओढ सुरू होते. तोच प्रकार डीजेच्या बाबतीतही होत आहे. डीजेच्या तालावर आपल्या मंडळाच्या मिरवणुकीसमोर जितक्या अधिक संख्येने तरुणाई थिरकते, तितके त्या मंडळांचे महत्त्व वाढते, असा एक गैरसमज निर्माण झाला आहे. परिणामी डीजे लावण्यावरून मंडळांमध्ये निष्कारण स्पर्धा आणि चुरस निर्माण होत आहे. यामुळे मिरवणुकीलासुद्धा विलंब होत आहे. मिरवणूक अमूक तास चालली याचा जर अभिमान वाटत असेल तर ती विचार करण्याजोगी बाब आहे. कारण या सर्व स्पर्धांमध्ये प्रशासनावर व पोलिसांवर किती ताण येतो, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? उत्सव हा आनंदासाठी आहे, स्पर्धेसाठी अथवा अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नाही, हे कोणी कोणाला सांगावे?
सकाळी सर्व डीजे 6 नंतर बंद पाडले
डीजेच्या आवाजाचा त्रास सर्वांनाच झाला. रात्रभर डीजेचा गोंगाट सुरूच होता. मात्र सकाळी 6 नंतर पोलीस प्रशासनाने सर्व डीजे बंद करण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले. तसेच हेमू कलानी चौकापासून एकही डीजे सिस्टीम पोलिसांनी पुढे जाऊ दिली नाही.









