आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : 4-1 ने मात : जेतेपदासाठी चीनला आज देणार टक्कर
वृत्तसंस्था/ हुलुनबोईर (चीन)
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने विजयी धडाका कायम ठेवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा धुव्वा उडवला. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग सहावा विजय ठरला. आता, जेतेपदासाठी भारतीय संघासमोर चीनचे आव्हान असेल.
भारताकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक 2 गोल केले तर उत्तम सिंग आणि जर्मनप्रीतने प्रत्येकी 1 गोल केला. दक्षिण कोरियाकडून यंग जी हुनने गोल केला. मैदानी गोलसाठी जर्मनप्रीतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मंगळवारी अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. यजमान चीनने प्रथमच फायनलमध्ये धडक मारताना पेनल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानला 2-0 असे पराभूत केले.
उत्तम सिंगचा मैदानी गोल
भारताने या सामन्याची भन्नाट सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळणाऱ्या टीम इंडियाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. यापूर्वी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात साखळी सामना झाला होता. यामध्ये भारताने कोरियाला नमवले होते. यामुळे या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळत असताना भारतीय संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले होते. सामन्यातील 13 व्या मिनिटाला उत्तम सिंगने शानदार गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. आरजितसिंगच्या पासवर उत्तमने मैदानी गोल केला. यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय कर्णधार हरमनप्रीतने 19 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताकडे 2-0 अशी आघाडी होती.
हरमनप्रीत, जर्मनप्रीतचे गोल अन् भारत विजयी
तिसऱ्या सत्रातही भारतीय संघाचा आक्रमकपणा कायम राहिला. 32 व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगने अप्रतिम गोल करत टीम इंडियाला 3-0 असे आघाडीवर नेले. पण, भारतीय संघाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 33 व्या मिनिटाला कोरियन यांग जिहुनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आघाडी 3-1 अशी कमी केली. हा त्यांचा पहिला व शेवटचा गोल ठरला. यानंतर कोरियन संघ कमबॅक करेल असे वाटत होते पण शेवटपर्यंत त्यांना गोल करण्यात अपयश आले. यानंतर 45 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, या संधीचे सोने करत हरमनप्रीतने शानदार गोल केला व भारताला 4-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. चौथ्या सत्रात भारताला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या तर कोरियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. अखेरपर्यंत भारतीय संघाने 4-1 अशी आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली.
टीम इंडिया सहाव्यांदा फायनलमध्ये
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत भारताचे वर्चस्व राहिले आहे. 13 वर्षांपूर्वी 2011 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे. भारताने चार वेळा तर पाकिस्तानने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर 2021 मध्ये दक्षिण कोरियाने विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आज यजमान चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवत पाचवे जेतेपद मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार असेल.
पेनल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानचा धुव्वा
दरम्यान, स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीनने पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. या उपांत्य फेरीत 60 मिनिटे सामना 1-1 असा बरोबरीत राहिला, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल घेण्यात आला. यावेळी शूटआऊटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना एकही गोल करता आला नाही, तर चीनने 2 गोल करत हा सामना 2-0 असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, दोन्ही संघ साखळी टप्प्यातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भिडले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने चीनचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता.









