आप’च्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खलबते : केजरीवाल आज राजीनामा देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. केजरीवाल यांनी उपराज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार केजरीवाल 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेत त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. उपराज्यपाल कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. तसेच आम आदमी पार्टीनेही केजरीवाल मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. याचदरम्यान सोमवारी दिवसभरात वरिष्ठ पातळीवर नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू होत्या. मात्र, नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अजूनही गुलदस्त्यात असून विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतरच ते जाहीर होणार असल्याचे समजते.
दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (उपरारज्यपाल) विनय सक्सेना यांनी मंगळवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्याची वेळ दिली आहे. यावेळी केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. राजीनामा देण्यापूर्वी नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी केजरीवाल यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये पुढील मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा झाली. तसेच ‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) बैठकही सोमवारी संध्याकाळी पार पडली. यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या भावी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावावर अद्याप चर्चा झाली नसल्याचे सांगितले. याबाबतचा निर्णय केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळ पक्ष घेईल, असे ते म्हणाले. मात्र, दिवसभरातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधील भेटी पाहता मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.
‘पीएसी’ सदस्यांशी वन टू वन चर्चा
सोमवारी झालेल्या ‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी ‘वन टू वन’ चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत नव्या सरकारच्या संभाव्य नेतृत्वावर सखोल चर्चा झाली. मी राजीनाम्याबाबत कठोर निर्णय घेत असून पक्षाला मजबूत नेतृत्व देऊ इच्छितो, असा केजरीवाल यांनी स्पष्ट केले. या बैठकीला ‘पीएसी’चे सदस्य असलेले अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष ससोदिया, संजय सिंग, दुर्गेश पाठक, आतिशी मार्लेना, गोपाल राय, इम्रान हुसेन, राघव चढ्ढा, राखी बिर्लान, पंकज गुप्ता आणि एन. डी. गुप्ता हे नेते सहभागी झाले होते.
शर्यतीत चार नावे
13 सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर कैलाश गेहलोत, गोपाल राय, आतिशी आणि सुनीता केजरीवाल यांच्यापैकी एकजण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी चर्चा आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल, असे सांगितले. मात्र, सध्या त्यांचेच नाव आघाडीवर असल्याचे समजते.
केजरीवालांच्या जामिनामुळे दिल्लीतील जनता खूश : आतिशी
‘आप’च्या सर्व मोठ्या नेत्यांना पीएमएलए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. या कडक कायद्यानुसार जामीन मिळणे खूप अवघड आहे. पण आता दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आमच्या पक्षाच्या बहुतांश नेत्यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. गेल्या 2 वर्षात भाजपच्या केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणांना एक ऊपयाही वसूल करता आला नाही. अरविंद केजरीवाल हे आमचे प्रमुख, मार्गदर्शक आणि आम्हाला राजकारणात आणणारे नेते आहेत. अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने माझ्याप्रमाणेच दिल्लीतील प्रत्येक व्यक्ती आनंदी आहे, असेही आतिशी यांनी स्पष्ट केले.









